🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🙏शेतीसाठी युरिया घातकच🙏
शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी असंख्य शेतकरी युरियासारख्या रासायनिक खतांचा अत्याधिक वापर करतात. पण त्यामुळे उत्पादन वाढण्याऐवजी जमीन नापीक होण्याचीच शक्यता अधिक असते. हरितक्रांतीमध्ये मोठे योगदान देणा-या हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्याचे प्रत्यंतर आले आहे. शेतक-यांना त्यापासून परावृत्त करून त्यांना जैविक खतांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी खुद्द ‘इफको’ या युरिया उत्पादक कंपनीनेच मोहीम आखली आहे. रासायनिक खतांच्या खरेदीसाठी सूट देण्याचे धोरण सरकारने अवलंबल्यामुळे अनेक शेतकरी त्याकडे चटकन आकर्षित होतात आणि जमिनीचे आणि आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेतात. आता खुद्द युरिया उत्पादक कंपनीनेच शेतक-यांना जागरूक करण्याचे काम सुरू केल्यानंतर सरकारने तरी त्यातून शहाणपण शिकण्याची आवश्यकता आहे.
कृषिप्रधान देशामध्ये हरितक्रांती घडवून आणण्यामध्ये ज्या राज्यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्या राज्यातील शेतीचे सोने पिकवणारी जमीन आता वाळवंट बनल्यात जमा आहे. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश यांसारख्या कृषिप्रधान राज्यांमध्ये युरियाच्या अत्याधिक वापराचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत. युरियाच्या चुकीच्या वापरामुळे जमीन संक्रमित होत आहे. त्याचप्रमाणे पिकांच्या उत्पादकतेवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधील शेतकरी युरियाचा गरजेपेक्षा 40 टक्के अधिक वापर करत आहेत, हे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी युरिया उत्पादक कंपनी इफकोनेही मान्य केले आहे. यामुळे जमिनीच्या पोटाशी असलेल्या पाण्यापर्यंत युरियाचे घटक मिसळले जातात. उत्पादन अधिकाधिक वाढावे यासाठी मातीमध्ये नायट्रोजनची मात्रा वाढवण्यासाठी शेतकरी युरियाचा वापर करतात. तथापि, उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत चुकीची आहे, असे इफकोने म्हटले आहे. हे शेतक-यांना पटवून देण्यासाठी आता इफकोने एक मोहीम हाती घेतली आहे. मातीची उपजत ताकद टिकून राहावी यासाठी शेतक-यांनी युरियाचा वापर कमी करावा, असे इफकोकडून हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतक-यांना सांगण्यासाठी प्रचारकार्य सुरू करण्यात आले आहे.
कृषी वैज्ञानिक शेतक-यांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशच्या (एनपीके) मिश्रणाचा वापर करण्यास सांगतात. पण शेतकरी अधिक उत्पादनासाठी युरियाचाच आधार घेतात. युरियाचा अधिक वापर केल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात याबद्दल शेतक-यांमध्ये अद्याप जागृती दिसत नाही. कृषितज्ज्ञ, कृषी विद्यालये आणि अन्य जाणकारांना बरोबर घेऊन इफकोने शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. इफकोच्या कृषी वैज्ञानिकांनी हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील अनेक जिल्ह्यांचा अलीकडेच दौरा केला. त्यावेळी बहुतेक शेतक-यांमध्ये युरियाच्या अधिक वापरामुळे कोणते दुष्परिणाम होतात याचे अज्ञानच दिसून आले. यासाठी भारतातील शेतक-यांनी चीनमधील शेतक-यांकडून धडा घेण्याची आवश्यकता आहे, असे इफकोचे म्हणणे आहे. चीनमध्ये रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करून अधिकाधिक चांगली आणि जास्त प्रमाणात पिके घेता येतात हे दाखवून दिले आहे. एकेकाळी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर युरियाची आयात होत होती. पण जैविक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर या देशातून युरिया निर्यात होऊ लागला. ज्याप्रमाणे चीनमध्ये जैविक खतांचा वापर अधिकाधिक शेतकरी करतात त्याचप्रमाणे आपल्या देशातही तो केला जावा यासाठी शेतक-यांना जागरूक करण्याचे काम सुरू आहे. इफकोने उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प तयार केला आहे. मातीमध्ये असणारी खनिजे आणि पिकांना उपयुक्त अन्य तत्त्व टिकवून ठेवण्यासाठी शेतक-यांनी जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून उत्पादनात 25 टक्के वाढ होऊ शकते,असे इफकोने म्हटले आहे.
इफकोचे एक अधिकारी उदय शंकरद अवस्थी यांनी आपल्या गावात याचा प्रयोग केला आणि तेथील सुमारे 15 हजार शेतक-यांना त्याचा लाभ मिळत आहे. या योजनेमध्ये सर्वात आधी खराब जमीन दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. त्याअंतर्गत जमिनीची उत्पादन क्षमता किती आहे, हे शोधून काढण्यात आले. इफकोच्या मोबाइल व्हॅन गावोगावी जाऊन शेतीचे नाममात्र दरात परीक्षण करण्यात आले आणि मातीच्या क्षमतेवरच उत्पन्न घेण्याचे आवाहन शेतक-यांना करण्यात आले. आज त्या भागात वेगवेगळ्या पिकांचा खजिना उभा राहिला आहे. त्यामध्ये नगदी पिकांबरोबरच भाज्याही पिकवल्या जात आहेत.
मागच्या वर्षी पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ एग्रीकल्चरल विभागाच्या वतीने रासायनिक खतांबाबत देशव्यापी अभियान आयोजित केले होते, त्यामध्ये रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे मातीतील पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मातीच्या उत्पादन क्षमतेवर 54 टक्के इतका प्रभाव पडतो, असे आढळून आले. ते पाहून आता इफकोतर्फे रासायनिक खतांऐवजी जैविक आणि हिरव्या खतांच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या खतांच्या वापरामुळे मातीतील पोषक तत्त्वे टिकून राहतात आणि त्यामुळे युरियामुळे होणारी हानी भरून निघते. देशातील अनेक राज्यांमध्ये सरकारतर्फे शेतक-यांना या प्रकारची खते मोफतही उपलब्ध करून दिली जात आहेत.
पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडिशा महाराष्ट्र यांसारख्या राज्यातील शेतकरी युरियासारख्या रासायनिक खतांचा वापर करतात, त्याबद्दल ग्रीनपीससारखी स्वयंसेवी संघटनाही शेतक-यांना जागरूक करण्याचे काम करत आहे. शेतक-यांनी पारंपरिक शेती आणि पर्यावरणाला अनुकूल जैविक शेती या गोष्टींचाच शेतीसाठी उपयोग केला पाहिजे, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे. ग्रीनपीसतर्फे जीवित माटी नावाचे एक अभियान चालवून शेतक-यांना रासायनिक खतांच्या धोक्यापासून सावध करण्याचे काम सुरू केले आहे. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी, रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळण्यासाठी सरकारतर्फे दीर्घकालीन योजना बनवणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचा थेट परिणाम आपल्या खाद्यान्न उत्पादनांवर होईल, असे शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांनी म्हटले आहे.
देशातील शेतक-यांच्या डोक्यात युरियाच्या वापराची नशा चढली आहे, असे दिसते. असे असूनही देशाचे कृषी मंत्रालय युरियाच्या धोक्याबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसते. राज्य सरकारांचे अधिकारी तर शेतक-यांच्या शेतापर्यंत जाण्याचेही कष्ट घेत नाहीत. कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक आणि संशोधन करणारांनी युरियाच्या दुष्परिणामांबाबत आवाज उठवला नसता तर सरकारचे डोळेही उघडले नसते. देशामध्ये हरितक्रांती झाल्यानंतर युरियाच्या मागणीत जबरदस्त वाढ झाली. 1951 मध्ये युरियाची मागणी 70,000 टन होती. 2009 पर्यंत ती 2.3 कोटी टनापर्यंत वाढली. देशामध्ये युरियाचा बेसुमार वापर होतो आहे, याबद्दल प्रख्यात कृषी संशोधक आणि हरितक्रांतीचे जनक एन. स्वामीनाथन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये हरितक्रांतीच्या सुरुवातीला शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता. पण हळूहळू शेतकरी त्याच्या वापराच्या आधीनच झाले. चीनसारख्या देशाने अशा खतांच्या वापरानंतर अत्याधिक उत्पादन आल्यानंतर शेतक-यांना जैविक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात यश मिळवले. पण भारतात मात्र ते अजून तरी शक्य झालेले नाही.
युरियाच्या अत्याधिक वापरामुळे जमिनीवर तर दुष्परिणाम होतोच, पण शेतक-यांच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयइसीएआर) म्हटले आहे. देशातील छोटे शेतकरी अधिक उत्पादन मिळावे, यासाठी युरियाचा वापर करतात. पण याचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर आता पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील मोठय़ा शेतक-यांनी जैविक खतांकडे आपला मोर्चा वळवला आहे. कृषी मंत्रालयाच्या एका ताज्या अहवालानुसार देशातील एकूण 14 कोटी शेती उत्पादक जमिनीपैकी 12 कोटी जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. कृषी योग्य जमीन संरक्षणासाठी आता इफकोसारखी देशातील मोठी युरिया उत्पादक कंपनी युरियाचा अत्याधिक वापर न करण्याबाबत शेतक-यांना जागरूक करत आहे. आता त्यामध्ये शेतक-यांच्या सहभागाविषयी सरकारनेच जबाबदारी उचलली पाहिजे.
🔴 शेतकरी बंधूंनो तरी आपल्याला विनंतीकी आपण घातक युरियाचा वापर कमी करावा त्या ऐवजी जैविक खते वापरावीत, धन्यवाद !