शेतकर्याची यशोगाथा

Sunday, December 06, 2015

सांगली : लग्न जुळवणं म्हटलं की वधू आणि वर पक्षांच्या अटी, अपेक्षा, पसंती-नापसंती, आवडी-निवडी हे सारं काही आलं. सगळ्या गोष्टी जुळून आल्या मगच शुभमंगल. सांगलीतील राणी वाघ आणि सचिन वाघ यांच्या लग्नाचीही निराळीच गोष्ट आहे. डेअरी डिप्लोमा केलेल्या वाघवाडीच्या सचिन वाघ यांना दुग्धव्यवसाय सुरु करण्याची इच्छा होती. यासाठीच आपल्या भावी पत्नीने गोठ्याची जबाबदारी सांभाळावी अशी अट त्यांनी राणी यांना घातली. राणीने ही अट मान्यदेखील केली. लग्नानंतर लगेचच घराशेजारीच भाड्याने जागा घेतली आणि खंडेश्वर गोठ्याची सुरुवात झाली. दहावीपर्यंत शिक्षण असूनही राणी या संपूर्ण गोठ्याची जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत.

पारंपरिक पद्धतीला फाट देत राणी यांनी मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केला. नऊ गायी विकत घेऊन गोठ्याची सुरुवात झाली. चाऱ्याची कमतरता असली तरी अधिक दूध देणाऱ्या एचएफ गायींची गोठ्यातच पैदास वाढवली. 2011 पर्यंत त्यांच्या गोठ्यात 35 गायी झाल्या. कोणतीही मोठी गुंतवणूक नाही की मोठा खर्च नाही. दुधातून मिळाऱ्या उत्पन्नातूनच राणी यांनी पतीच्या सहाय्याने गोठ्यात हळूहळू सुधारणा केल्या. 110 बाय 50 फूट गोठ्यात 12 बाय 4 फूटाचं मिल्किंग पार्लर उभारलं. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केला. चितळे डेअरीकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. शिवाय त्यांनी तिथून प्रशिक्षणही घेतलं. मुक्त संचार गोठाचे राणी वाघ यांना अनेक फायदे लक्षात आले.

सकाळी साडे पाच वाजल्यापासून राणी यांच्या दिनक्रमाची सुरुवात होते. जनावरांना पोषक आहार दिला जातो. मिल्किंग मशिनमध्ये स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेत, त्याच्या सहाय्याने दूध काढलं जातं. या कामांमध्ये राणी यांना त्यांच्या पतीचीही साथ मिळते.

राणीकडे आज याच्याकडे 11 गायी आणि 6 पाड्या आहेत. यातील 8 गायी दुधाळ असून त्यांच्यापासून दररोजच 120 ते 150 लिटर दुधाचं संकलन होत आहे.

सध्या त्यांना दुधासाठी 24.50 रुपये लिटरचा दर मिळतो. दररोज सव्वाशे ते दीडशे लिटर दूध संकलन होत असल्याने महिन्याला साधारण एक ते सव्वा लाखांचं उत्पन्न मिळतं. वर्षाला 20 ते 25 ट्रॉली शेणखत त्यांना मिळतं. यातून 50 ते 60 हजार मिळतात. म्हणजेच वर्षाला खर्च जाता जवळपास 10 लाखांचं उत्पन्न राणी वाघ यांना या गोठ्यापासून मिळतं आहे.

दहावीपर्यंत शिक्षण झालं असलं तरी सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राणी वाघ गोठ्याचं नियोजन करतात. जनावरांच्या खाद्यापासून त्यांच्या लसीकरणाकडे लक्ष पुरवतात.

राणी वाघ यांच्या खंडेश्वर गोठ्यात चितळे डेअरीकडून महिलांसाठी दूध उत्पादनाच्या प्रशिक्षणाचं केंद्र उभारण्यात येणार आहे. शेती नाही शिवाय चाऱ्याची कमतरता असतानाही राणी वाघ यांनी यशस्वीरित्या गोठा सांभाळला. यासाठी त्यांना 2009 साली चितळे डेअरीचा उत्कृष्ट पशुपालकाचा पुरस्कार मिळाला. दुधाळ जनावारांची चांगली पैदास व्हावी यासाठी जनावरांचं मॅपिंग आणि गुणसुत्रांचा अभ्यास करणाऱ्या इंग्लंडच्या सुजान स्टिव्हवर्ट यांनीही राणी वाघ यांच्या गोठ्याला 2012 मध्ये भेट दिली. याचसोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमधील अनेक शास्त्रज्ञ आणि पशुपालकांनी राणी वाघ याच्या गोठ्याला भेटी दिल्या आणि त्यांचं कौतुक केलं. मुक्त संचार पद्धत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत दुग्ध व्यवसायातून राणी वाघ यांनी मिळवलेलं यश महिलांना प्रेरणा देणार आहे.

You Might Also Like

0 comments