8 एकराच्या डाळिंब बागेतून कोटीचं उत्पन्न!
Sunday, March 13, 2016दिनांक/Date : ७ एप्रिल २०१५ / 7 April 2015 पंढरपूर: एका बाजूला दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत असताना मात्र दुसरीकडे एका बळीराजाने आपल्या कष्टातून एक आश्वासक वातावरण तयार केलं आहे. तानाजी हाके या शेतकऱ्याने निसर्गाच्या प्रतिकूल आव्हानांना तोंड देत 8 एकराच्या डाळिंब बागेतून 1 कोटीचं उत्पन्न कमावण्याचा पराक्रम केला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावाच्या तानाजी हाके या सातवी पास शेतकऱ्याने डाळिंब बागायतदारांसाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. गेल्या 4 वर्षांपासून दरवर्षाला 1 कोटींची कमाई करण्याचा भिम पराक्रम म्हस्के यांनी केला आहे. हाके यांचं डाळिंब युरोपच्या मार्केटची शान वाढवत आहे. परिस्थितीमुळे शिक्षण सोडल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याची जिद्द हाके यांनी मनात बाळगळून होते. मात्र निसर्गाची हुलकावणी पाचवीला पुजलेली. पण परिस्थिती पुढे गुडघे टेकण्यापेक्षा तिला आव्हान देत जगायची जिद्द आणि जोडीला प्रामाणिक कष्टाची तयारी एवढच काय ते हाके यांचं भांडवल. याच भांडवलाच्या जिवावर आज तानाजी हाके सलग 4 वर्षे आपल्या शेतातील माल युरोपला पाठवित आहेत. एका बाजूला तेल्यामुळे सर्वच ठिकाणच्या डाळिंब बागा उध्वस्त होत असताना तसंच झाडावर फळ टिकविणे अवघड असताना तानाजी हाके यांनी गेली 4 वर्षे युरोपच्या अनेक जाचक अटींची शर्यत पार करीत फळाला युरोप बाजारात नुसते उतरविलेच नाही तर त्यांच्या मालाचा त्यांनी ब्रँड तयार केला. त्यामुळेच भारतातील माल युरोप मार्केटला जाण्यापूर्वीच एक्सपोर्टर हाके यांच्या शेतातील माल उचलायला पोहोचले आहेत. आज तानाजी हाके यांनी याच पैशाच्या मदतीने शेतीचे क्षेत्र तर वाढवालेच याशिवाय अजून 15 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन करून नवीन डाळिंब बागही लावली आहे. जिद्द, कठीण परिश्रम आणि स्वप्न बघण्याची इच्छा असेल तर एखादा अशिक्षीत शेतकरीही प्रतिकूल परिस्थितीत कसा स्वर्ग निर्माण करू शकतो याचे हे जिवंत उदाहरण तानाजी हाके या तरुण शेतकऱ्याने घालून दिले आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी भाग तसा थोडा बागाईत मात्र काही भागाला अजूनही पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी हाके यांनी 3 किलोमीटर अंतरावरून पाईप लाईन करून शेतीसाठी पाणी आले आहे. आणलेले पाणी शेतातील विहिरीत आणि 2 कोटी लिटर क्षमतेच्या शेत तळ्यात साठवले. तेल्याला औषध नाही हे सांगताना त्यांनी झाडे ताकतवान बनविण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून झाडे मजबूत ठेवली. एक्सपोर्टरच्या सल्ल्यानुसार युरोपमध्ये आवश्यक असणाऱ्या आणि मान्य असणाऱ्या फवारण्या करण्याचा नियम त्यांनी कटाक्षाने पाळला. डाळिंब लावतानाच फक्त युरोपमध्ये माल विकायचे प्रामाणिक स्वप्न पाहून त्यानुसार कष्ट केल्याने पहिल्याच प्रयत्नात त्यांचा माल युरोपमध्ये पास झाला. त्यानंतर त्यांचा वारू गेली चार वर्षे दौड करत आहे. दुर्दैवाने कृषी विद्यापीठं आणि कृषी विभागाकडून कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांनी आपल्या कृषिक्रांती फार्मर्स ग्रुपच्या मदतीनं डाळिंब एक्स्पोर्टसाठीचे नियोजन बनविले आणि त्यात ते यशस्वी झाले. याच प्रयत्नातून पहिल्या वर्षी हाके यांनी 56 टन, दुसऱ्या वर्षी 125 टन आणि या वर्षी पहिल्या टप्प्यात 75 टन माल युरोपच्या बाजारात निर्यात केला. या वर्षी तर एका बाजूला पावसाळ्यात पावसाने दगा दिल्याने अडचणीत असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी तुफानी अवकाळी पावसाला सामोरे जावे लागल्यानं यंदा फळ मिळणेदेखील मुश्किल होणार असे वाटत होते. मात्र असं असताना गेल्या महिन्याभरात हाके यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ तर लागलेच शिवाय यंदा युरोप मार्केट सुरु होण्यापूर्वीच एक्सपोर्टरने त्यांचा माल तपासून नेण्यास सुरुवात केली आहे. सध्या INI या कंपनीनं हाके यांचा माल उचलला असून अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्येही हाके यांनी चांगले फळ दिल्याचे आयएनआयचे संचालक मोहन डुकरे यांनी सांगितले.
0 comments