खासगी बाजारसमितीसाठी कोटयवधी खर्चाच्या अटी पुणे,
Friday, March 04, 2016महाराष्ट्र :
खासगी बाजारसमितीसाठी कोटयवधी खर्चाच्या अटी
राज्यात खासगी बाजार स्थापन करण्यासाठी परवानगी आहे. मात्र, अशी बाजारसमिती सुरू करण्यासाठी किमान खिशात पाच कोटी रुपये हवेत, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. बाजारसमित्यांसमोर स्पर्धा उभी करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करून खासगी बाजार समिती सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातली कोणतीही व्यक्ती स्वमालकीची बाजार समिती काढू शकते. परंतू ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिका क्षेत्रात खासगी बाजारसमिती काढायची असल्यास किमान दहा एकर आणि बिगर महापालिका क्षेत्रात पाच एकर जागा हवी, अशी अट आहे. मुळात दहा एकर जागा महापालिका क्षेत्रात असल्यास ती व्यक्ती अब्जाधीश समजली जाते. महापालिका क्षेत्रातील भूखंडाचे किमान 2-3 कोटी रुपये एकरपासून सुरू होतात. खासगी बाजारसमिती काढण्यासाठी केवळ जागा असून भागत नाही. त्यासाठी महापालिका क्षेत्राकरीता 20 लाख रुपये आणि बिगर महापालिका क्षेत्रात पाच लाख रुपयांची बॅंक गॅरंटी द्यावी लागते. शेतक-यांसाठी खासगी बाजारात विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यात लिलावगृह, गोदाम, रस्ते,पिण्याचे पाणी, शेतकरी निवास, टॉयलेट तसेच कामे करावी लागते. ‘खासगी बाजारात या सुविधा देण्यासाठी मालकाला किमान 5 कोटी रुपये खर्च करावे लागतील. जिल्हाठिकाण असल्यास 2 कोटी रुपये आणि इतर ठिकाणी किमान 1 कोटी रुपये खर्च करावेच लागतात,’अशी माहिती सूत्रांनी दिली. खर्चाची ही मालिका इथेच थांबत नाही. खासगी बाजारसमितीची लायसन फी म्हणून 50 हजार रुपये मोजावे लागतात. अर्थात, हे सर्व करून देखील बाजारसमिती नफ्यात राहील याची हमी नसते. ‘कायद्याने खासगी बाजारसमितीची प्रक्रिया इतकी किचकट केली आहे की त्यामुळे राज्यात 50 च्यावर देखील बाजार उभे राहिले नाहीत. अनेक बाजार बंद पडले. त्यात खासगी बाजारचालकांना सपाटून तोटा झाला आहे,’असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
0 comments