असा घ्या सीताफळाचा उन्हाळी बहर
Tuesday, March 15, 2016[15/03 6:30 pm] +91 95278 17528: 🌾होय आम्ही शेतकरी 🌾
🍏 असा घ्या सीताफळाचा उन्हाळी बहर 🍏
बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. बागेत पडलेली पाने, रोगट फळे, झाडांवरील काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. बागेतील मित्रकीटकांना हानी पोचणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. झाडाचे खोड हे जमिनीपासून दोन फुटांपर्यंत पूर्ण रिकामे ठेवावे. झाडांना योग्य वळण देण्याकरिता छाटणी गरजेची असते. छाटणी करताना जमिनीपासून दोन फुटांपर्यंतचे फुटवे काढून, त्याच्यावर चारी दिशांना फांद्या विखुरलेल्या छत्रीप्रमाणे ठेवाव्यात. बागेची उंची नऊ ते दहा फुटांपर्यंतच मर्यादित ठेवावी.
सीताफळ बागेपासून दर्जेदार व चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी योग्य बहरात उत्पादन घेणे अधिक फायद्याचे असते. सीताफळाच्या चांगल्या उत्पादनासाठी हवामानातील बदलाप्रमाणे व्यवस्थापन महत्त्वाची गोष्ट आहे. हवामानातील बदलाचे विपरीत परिणाम म्हणजे झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम, नवीन व वेगवेगळ्या रोग - किडींचा प्रादुर्भाव होणे, फळांची फुगवण व फळांच्या आकारमानावर विपरीत परिणाम होणे, फळांवर तपकिरी छटा येणे, फळे उकलणे किंवा फळे भेगाळणे, अपक्व फळे अचानक पिकणे, फळे दगडासारखी कडक होणे इत्यादी प्रकार गेल्या चार वर्षांत दिसून येत आहेत.
सीताफळ उन्हाळी बहार पुण्याच्या पुरंदर व जुन्नर, सातारा, अहमदनगरच्या पारनेर आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये घेतला जातो.
🍏 दर्जेदार उन्हाळी बहराकरिता नियोजन 🍏
🍏बहर घेताना त्या विभागातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, धुके, अवकाळी पाऊस, गारा इत्यादी घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
🍏बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. बागेत पडलेली पाने, रोगट फळे, झाडावरील काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. बागेतील मित्रकीटकांना हानी पोचणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.
* झाडाचे खोड हे जमिनीपासून दोन फुटांपर्यंत पूर्ण रिकामे ठेवावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खोडावर बोर्डो मिश्रण व कीटकनाशके यांचा लेप द्यावा.
🍏बागेत खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष घ्यावे, दर्जेदार फळे मिळण्यासाठी ते गरजेचे आहे.
🍏सीताफळाची छाटणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. झाडांना योग्य वळण देण्याकरिता छाटणी गरजेची असते. छाटणी करताना जमिनीपासून दोन फुटांपर्यंतचे फुटवे काढून, त्याच्यावर चारी दिशांना फांद्या विखुरलेल्या छत्रीप्रमाणे ठेवाव्यात. बागेची उंची नऊ ते दहा फुटांपर्यंतच मर्यादित ठेवावी. जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. सीताफळाच्या जुन्या झाडांवर "बांडगूळ' असेल, तर त्याचा फांदीसहित नायनाट करावा.
🍏सेंद्रिय खते, उपयुक्त जिवाणू, गरजेनुसार रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. बागेस खते देण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे माती परीक्षणानुसार 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश द्यावे. नत्र खत हे दोन समान हप्त्यांमध्ये आणि स्फुरद तसेच पालाश ताण संपल्यानंतर किंवा पाणी देताना द्यावे. खते शक्यतो खोडापासून दूर आणि फांद्यांच्या परिघाखाली मातीमध्ये योग्य प्रकारे मिसळून द्यावीत.
🍏बागेस हिरवळीचे खत दिल्याने अधिक फायदा होतो; त्याकरिता खरीप हंगामात ताग, मूग, उडीद या पिकांची लागवड करावी. फुलोरा येण्याच्या अगोदर जमिनीत गाडून हिरवळीचे खत द्यावे.
🍏सीताफळ बागेत पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. बागेत सतत ओलावा वाहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सूत्रकृमी व मर रोगाचा उपद्रव वाढू शकतो.
🍏उन्हाळी बहर येत असताना बागेभोवती व वाफ्यांच्या कडेने मका किंवा बाजरी पिकाची लागवड करावी.
🍏पीक फुलोऱ्यात असताना मधमाश्यांचे संगोपन करण्यावर भर द्यावा. शिफारशीत कीडनाशकांचाच वापर करावा.
🍏उन्हाळी बहराचे पहिले पाणी जानेवारी ते मे या महिन्यात देण्यात येते. पाण्याची पहिली पाळी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत झाडांना नवीन पालवी फुटते. झाड फुलांनी बहरून जाते. उन्हाळी बहराची फळे जून ते ऑगस्टपर्यंत मिळतात. सदरच्या फळांना बाजारभाव चांगले मिळतात. बहराचे व्यवस्थापन करताना तापमान व पाण्याची उपलब्धता या दोन प्रमुख बाबींचा विचार करावा.
🍏सूर्यप्रकाश - हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक आहे. बहराचे पाणी सुरू करण्यापासून ते फळे काढणीपर्यंत चांगला सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. तसेच, आर्द्रता हा दुसरा महत्त्वाचा घटक झाडांची वाढ, फळधारणा, फळांची वाढ, कीड व रोगांचा उपद्रव या बाबीत पूर्ण परिणाम घडवून आणत असतो. सर्वांत अधिक फळधारणा जमिनीलगतच्या भागात आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीलगत अधिक आर्द्रता हे आहे.
🍏आच्छादन - उन्हाळी बहराचे नियोजन करताना झाडांच्या मध्ये व मोकळ्या जागेत पालापाचोळ्याचे आच्छादन करणे गरजेचे असते. आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते व तणांचा उपद्रवही कमी होतो.
🍏सीताफळासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. उत्पादनामध्ये भरीव वाढ होते. फळांची प्रतवारी सुधारण्यास मदत होते. प्रति झाड पाण्याची मात्रा अनुभवानुसार जमिनीचा पोत, पीकवाढीची अवस्था, हवामान यानुसार बदल करावेत. जमीन नेहमी वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी द्यावे.
🍏फर्टिगेशन आणि विद्राव्य खतांचे महत्त्व -
ठिबक सिंचनामधून विद्राव्य खते वापरावयाच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र म्हणतात. ठिबक सिंचनाबरोबरच पिकाच्या वाढीच्या अवस्थेत लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा हा दररोज किंवा दिवसाआड थेट मुळांच्या कक्षेत केला जातो, त्यामुळे खतांचा प्रभावी वापर होतो व उत्पादनात, प्रतवारीत भरघोस वाढ होते. खतांचे वेळापत्रक माती परीक्षण अहवालाप्रमाणे असावे.
🍏उन्हाळी बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी प्रथम खोडावर व फांद्यांवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. रोगाची तीव्रता पडताळून 15 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या संपूर्ण झाडावर कराव्यात.
🍏पिठ्या ढेकणाच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खोडांची व फांद्यांची बहरापूर्वी स्वच्छता महत्त्वाची आहे. जून - जुलै महिन्यात मिली बगची पिल्ले खोडावरून झाडावर चढतात. यासाठी उपाय म्हणून 15 ते 20 सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिक पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे व सदरची पट्टी खोडाला बांधावी, त्यामुळे पिल्ले ग्रीसला चिकटून मरून जातात.
🍏क्रिपटोलिमस मॉंट्रोझायरी या परोपजीवी कीटकांमुळे पांढरा ढेकूण या किडीचे प्रभावी नियंत्रण होत असल्याचे आढळले आहे. त्याकरिता 1000 ते 1500 भुंगेरे प्रति एकर सायंकाळी सहानंतर बागेत सोडावेत. बागेत मित्रकीटकांना अपायकारक कीटकनाशके फवारू नयेत.
🍏फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी. फळांची वेळीच विरळणी केली, तर फळांची प्रतवारी व वजनवाढीचा फायदा होतो. अधिक वजनाच्या सुबक फळांना बाजारात चांगला भाव मिळतो.
🍏 सीताफळ छाटणी महत्त्वाची 🍏
उन्हाळी बहरामध्ये दुबार छाटणी केली जाते. पहिली छाटणी ही बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर केली जाते. सर्वसाधारणपणे 25 जूननंतर झाडावर फळे असताना दुसरी छाटणी करावी. झाडांना आठ ते दहा दिवसांत नवीन फूट व पालवी येते. त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात काढणीस येतात, त्यामुळे एकाच झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते.
|| अन्नदाता सुखी भवः ||
अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..
🌾होय आम्ही शेतकरी 🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866
[15/03 6:30 pm] +91 95278 17528: शेतक-यांची चंची
-रामेश्वर चांडक, बीड
बाजरीपासून कीटकनाशक तयार कराः-
आपण कीड नियंत्रण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करतो. हा वापर सर्वात जास्त भाजीपाला पिकामध्ये पहावयास मिळतो. भाजापिकांमध्ये सर्वात मोठी समस्या ही सर्व प्रकारच्या अळ्यांची असते. त्यांचे नियंत्रणासाठी सकाळी आपण त्यावर औषधांचा वापर करतो व दुपारी तीच भाजी आधी आपण घरी खातो व नंतर बाजारात विक्रीसाठी नेतो. अशा परिस्थितीमध्ये आपण या कीटकनाशकांच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे विविध व्याधी आपल्या मागे लागलेल्या असतात.
यासाठी स्वतः स्थानीक पातळीवर औषध तयार करता आले तर उत्तम म्हणून एक बाजरीपासून तयार करावयाच्या अळीनाशकाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यासाठी एक किलो बजरीचे पीठ, एक १५ लिटरचा छोटे तोंड असलेला तेलाचा किंवा डालड्याचा डब्बा व १० लिटर पाणी ही सामुग्री लागते. एक किलो बाजरीचे पीठ १० लिटर पाण्यात चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण १५ लिटरच्या डब्यात टाकावे. डब्ब्याचे तोंड झाळून घ्यावे किंवा ते हवाबंद करण्यासाठी एक चांगले झाकण त्यावर लावावे. हा डब्बा आपल्या उखंड्याच्या (शेणखत टाकण्याची जागा) मध्यभागी ४ ते ५ फुट खोल पुरावा. हा कालावधी साधारण ५० दिवसांचा असतो. यानंतर उखंड्यातून डब्बा बाहेर काढल्यानंतर त्यातील औषध सरळ फवारणीसाठी वापरता येते. डब्ब्यातील बाजरी पिठापासून तयार केलेले औषध २ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेवून फवारणी करावी. या औषधामुळे मोठ्यात मोठ्या अळींचा नाश करण्याची क्षमता आहे. करून तर बघा. काय होईल डब्बा, बाजरीचे पीठच वाया जाईल. केल्या शिवाय समजणार नाही. शेतकरी बटव्यातील हे एक सुंदर कीटकनाशक आहे.
0 comments