गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी त्याचे फायदे प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
Wednesday, September 27, 2017गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी त्याचे फायदे
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडुळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलायटीक, सेल्युलो लाटकीक आणि लिग्नो लायटीक एन्झाईम्स असतात . या एन्झाईम्समुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन साध्या सेंद्रिय पदार्थांतील सहजीवी जीवाणू व अॅक्टीनोमायसीटीस बुरशीमुळे लिगनीनयुक्त सहसा लवकर न कुजणार्या पदार्थांचे अन्नद्रवीकरण होते.
गांडूळ ह्या प्राण्याचा अॅनिलिडा समूहात व ओलिगोचीटा वर्गात समावेश होतो. आपल्या शेतीसाठी गांडूळ नवीन नाहीत. मराठीत गांडूळ,, दानवे वाळे, शिदोड अथवा केंचवे या नावाने ओळखल्या जाणार्या या प्राण्याला इंग्रजीत 'अर्थवर्म' असे नाव आहे. शेतीमधील विषारी किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ तर होतेच परंतु पर्यावरणावर दुष्परिणामही होतो. त्यामुळे जगातील बरेच देश गांडूळांचा वापर करीत आहेत.
आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर (गांडूळांच्या वापर करून) पालापाचोळा, शेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत बागेत, शेतात अथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो. त्यासाठी गांडूळांची शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे आहे.
गांडूळ हा नाजूक गुळगुळीत, लवचीक शरीर असलेला भूचर असून तो २ इंचापासून दोन फुटापर्यंत लांब असून त्याचे वजन ०.५ ग्रॅम पासून १० ग्रॅमपर्यंत असून शकते. हा रंगाने तांबूस, तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. त्याला हवे ते वातावरण मिळाले की, तो अविश्रांत कार्य करीत असतो. शेण हे गांडूळांचे आवडते खाद्य असून शेणाबरोबर शेतातील काडीकचरा अथवा पालापाचोळा थोडी प्रक्रिया करून दिला तर ते गांडूळांचे उत्तम खाद्य ठरते.
जगात गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी त्यांचे मुख्यत: दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.
१) जमिनीच्या पृष्ठभागावर कचर्यात राहून कचरा खाणारी गांडुळे, ह्यांचा वाढीचा व उत्पत्तीचा वेग जास्त असल्यामुळे यांचा वापर मुख्यत: गांडूळखत तयार करण्यासाठी केला जातो. ह्या प्रकारामध्ये मुखत: आयसोनीया फीटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा इ. समावेश आहे.
२) दुसर्या प्रकराची गांडुळे जमिनीत खोलवर बिळे तयार करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. ही गांडुळे जास्त प्रमाणात माती खातात व सेंद्रिय पदार्थ खाण्याचे प्रमाण फार कमी असते. जमिनीमध्ये योग्य वातावरण निर्माण केल्यास ही गांडूळे शेतजमिनीत आपोआप तयार होतात.
अर्धवट कुजलेला शेतातील / जैविक विघटनशील काडीकचरा, पालापाचोळा, टाकाऊ सेंद्रिय पदार्थ तसेच कुजलेले शेण इत्यादी पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता ते पदार्थांचे तुकडे खाऊन चर्वन करतात. त्यांचे पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात त्यालाच 'गांडुळखत' असे म्हणतात. या खतामध्ये गांडुळांची लहान पिल्ले आणि अंडकोश यांचाही समावेश असतो.
गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.
१) पिकांचे अवशेष : धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत.
२) जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते : शेण, मूत्र, शेळ्या आणि मेंढ्यांची लीद, कोंबड्यांची विष्ठा, जनावरांची हाडे, काळती इत्यादी.
३) फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा
४) हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ.
५) घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इत्यादी.
६) घरातील सांडपाणी.
गांडुळांची पैदास : गांडुळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी १, लांब १ मिटर रुंद आणि ३० सें. मी. जाडीचा सावकाश कुजणार्या सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे लाकडाचा भुसा, भाताचे तूस, नारळाचा काथ्या, गवत अथवा असाचे पाचत यांचा थर द्यावा . त्यानंतर ३ सें. मी. जाडीचा कुजलेले शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून सर्व थर पाण्याने भिजवून घ्यावेत. वरच्या थरावर पूर्ण वाढ झालेली २००० गांडुळे सोडावीत, त्यावर गांडुळांच्या खाद्याचा १५ सें. मी. जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये १० भाग भाजीपाल्यांचे अवशेष अथवा कुजलेल्या पालापाचोळ्याचे असे मिश्रण करावे . हे मिश्रण गांडूळांच्या वाढीस पोषक खाद्य ठरते, या थरावर ५० % पाणी शिंपडावे. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी ही खोकी सावलीत ठेवावीत. शेवट्या थरावर ओला बारदाना अंथरावा. उंदीर, घूस, मुंग्या, गोम, बेडूक यांपासून गांडूळांचे संरक्षण करावे.
८ ते १० दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगांच्या स्वरूपात गांडूळांची कणीदार कात दिसून येईल. ही कात ब्रशच्या सहाय्याने काढून घ्यावी.