सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज
Sunday, August 28, 2016
१८९३ साली लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ या वर्तमानपत्रातुन सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना लोकांसमोर मांडली.

स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश सरकारने सार्वजनिक सभा आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती आणि जन-जागृतीसाठी लोकांना एकत्र आणणे अत्यंत गरजेचे होते. देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याच्या विचाराने लोकमान्य टिळक भारले होते. लोकांना एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत गिरगांव चौपाटीवर समुद्र किनारी बसल्या बसल्या ते वाळूपासुन मुर्त्या बनवत आणि त्या मुर्त्या पाहायला लोक जमा होत असत. त्या मुर्त्यांना पाहिल्यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांवरून टिळकांच्या असे लक्षात आले की भारतीय लोक हे अत्यंत श्रद्धाळु आणि ईश्वराला घाबरणारे आहेत. देव आणि धार्मिक भावनांचा भारतीय जनमानसांच्या मनावर एवढा जबरदस्त पगडा आहे की धार्मिक कार्यासाठी आपापसातील हेवे-दावे आणि वैर विसरुन ते एकत्र येतात. यामुळे टिळकांच्या मनात विखुरलेल्या जनतेला एकत्र बांधण्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला. धार्मिक कारणासाठी लोकांच्या एकत्र येण्याला ब्रिटीश सरकार विरोध करू शकणार नाही हे लोकमान्य टिळकांनीओळखले आणि त्यातुनच गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप द्यायची कल्पना त्यांच्या मनात आली.
बुद्धीची देवता गणपती, ही सर्व स्तरातील लोकांना प्रिय आणि पुजनीय असल्यामुळे या कार्यासाठी त्यांनी गणेशाची निवड केली. हिंदुदिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरवात झाली आणि अनंत चतुर्दशीला गणेश मुर्तीचे विसर्जन करायची प्रथा पडली. उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र जमत असत आणि त्यामुळे त्यांचे प्रबोधन करणे सहज शक्य होत असे. ब्रिटीश सरकार धार्मिक कारणास्तव या उत्सवाला विरोध करू शकत नसल्यामुळे, टिळकांचा लोकांमध्ये राष्ट्राभिमान, एकता आणि स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा हेतु सफल झाला. टिळकांनी गणेश विसर्जनाची मिरवणुक काढण्याची संकल्पना मांडली, त्यामुळे लोकांना एकत्र आणुन मिरवणूकीच्या निमीत्ताने स्वातंत्र्य आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणजे नक्की काय हे दाखवुन देण्याचा टिळकांना एक उपाय सापडला.
शिवाजी महाराजांच्या काळातही (१६३०-१६८०) हा सण स्थानिक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिकरित्या साजरा केला जायचा. नंतर पेशव्यांच्या काळात पुणे हे गणेशोत्सवाचे केंद्रस्थान बनले. पेशव्यांनी प्रोत्साहन देऊन या सणाची महती वाढवली पण पुढे पेशवाईचे पतन झाल्यावर मात्र या सणाचे महत्व कमी होत गेले. लोक, फक्त आपापल्या घरातच हा सण साजरा करू लागल्यामुळे हळुहळु या सणाचे उत्सवाचे रूप गायब झाले. पुढे भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी १८९२ साली ‘भाऊसाहेब रंगारी गणपती, बुधवार पेठ’ या नावाने सर्वप्रथम गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याविषयीची पहिली बैठक भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार पेठ, पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी घेतली गेली ज्याला ‘भाऊ रंगारी भवन’ म्हणुन ओळखले जाते.
पुढे १८९३ साली लोकमान्य टिळकांनी‘केसरी’ या वर्तमानपत्रातुन सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना लोकांसमोर मांडली. १८९४ साली पुण्यातील ‘केसरी वाडा’ येथे टिळकांनी गणपतीच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार करायला सुरुवात केल्यावर हळुहळु गणेशोत्सवाला पुन्हा एका सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले. आज हा उत्सव सर्व भारतात उत्साहाने साजरा केला जातो पण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. भारताबाहेर नेपाळमधील तराई भाग आणि इतर देश जसे अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, सिंगापुर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, बर्मा, फिजी, न्युझिलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील हिंदु लोक हा उत्सव उत्साहात साजरा करतात.
लोकांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने पुढे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना पण रुजली. आज मात्र सगळे चित्र पालटले आहे.टिळकांनी मांडलेली मुळ संकल्पना बाजुला पडुन केवळ एक प्रथा बनुन राहिली आहे. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतही अमुलाग्र बदल झाला आहे. एक गाव एक गणपती जाऊन आता एक रस्ता दहा गणपती हा प्रकार सुरु झाला आहे. चौका-चौकात गणेश मंडळे स्थापन झाली आहेत. सर्व मंडळं मोठमोठे देखावे मांडुन, कर्कश्य आवाजात DJ (Disc Jockey) वाजवुन आणि सेलिब्रिटींना बोलवुन लोकांना आकर्षित करण्याचा आटापीटा करताना दिसतात. मंडळांच्या सभासदांनी वर्गणीच्या नावाखाली सामान्य जनतेची लुट करणे हे तर नित्याचेच झाले आहे. आजकाल शाडूच्या मातीच्या मुर्त्या जाऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना प्राधान्य दिले जाते कारण त्या वजनाने हलक्या आणि किमतीने स्वस्त पडतात पण पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करायला वेळ कोणाकडे आहे? विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नदी आणि समुद्र किनारी जाऊन पाहिले असता आपल्या लाडक्या गणरायाच्या भग्नावस्थेतील मुर्त्यांची होणारी विटंबना पाहून डोळे पाणावतात.
कर्णकटु आवाजातील बिभत्स गाणी आणि DJ (Disc Jockey) हा आजकाल सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. त्या आवाजामुळे तान्ही मुले आणि जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास तर कोणाच्या खिजगणतीतही नसतो. स्पिकरच्या भिंतीसमोर कानठळ्या बसवणाऱ्या गाण्यांच्या तालावर अंगविक्षेप करत नाचणारी लहान मुले पाहिली की त्यांचे कौतुक करणाऱ्या त्यांच्या आई-बापांची कीव करावीशी वाटते. एवढ्या मोठ्या डेसिबल्सच्या आवाजाचे आपल्या लहानग्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर किती दुरगामी परिणाम होतील हेही त्यांच्या लक्षात येऊ नये, याचेच आश्चर्य वाटते. ऐन गणेशोत्सवात मंडपामागे दारुच्या बाटल्यांचे ढिग सापडल्याच्या येणाऱ्या बातम्या तसेच कार्यक्रम आटपल्यावर श्रमपरिहाराच्या नावावर गुपचुप चालणाऱ्या नॉनव्हेज आणि ओल्या पार्ट्यांच्या बातम्या मन विषण्ण करतात. आपण काय करतोय याचेही भान आजच्या युवा वर्गाला असु नये?
कोणाचा गणपती सर्वात मोठा? मिरवणुकीत कोणता गणपती सर्वात पुढे राहणार? कोणत्या मंडळाचा देखावा सर्वात भव्य आहे? DJ (Disc Jockey) चा सर्वात मोठा थर कोणत्या मंडळाचा आहे? सर्वात मोठे ढोल पथक कोणाचे? कोणते मंडळ, किती मोठा सेलिब्रिटी आणते ह्याचीच चुरस सर्व मंडळांमध्ये दिसते. सगळीकडे साधेपणापेक्षा नुसता बडेजावच जास्त आढळतो. स्थानिक नेते आणि व्यापारी, सणाचे औचित्य साधुन आपली जाहिरात करतात आणि त्या बदल्यात मंडळाला बक्कळ पैसे मिळतात, जे अवास्तव खर्च भागवण्यासाठी वापरले जातात. अनाधिकृतपणे मांडव घालुन अर्ध्यापेक्षा अधिक तर कधी कधी पुर्ण रस्ताच अडवला जातो. वाहतुकीस अडथळा होतो म्हणुन तक्रार करणाऱ्या वाहनचालकास दमदाटी, प्रसंगी मारहाण करायलाही काही मंडळाचे सदस्य मागे पुढे पाहात नाहीत. उत्सवासाठी रस्ते अडवल्यामुळे, अडलेल्या गरोदर स्त्रीया तसेच अपघात ग्रस्त लोकांना घेऊन जाणर्या रूग्णवाहिका वेळेवर रूग्णालयात पोहोचु न शकल्यामुळे कितीतरी लोक वाटेतच दगावल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. तसेच वेळेवर आगीची माहिती मिळूनही अग्निशामक दलाच्या गाड्या योग्यवेळी घटनास्थळी पोहोचू न शकल्यामुळे निश्कारण जिवीतहानी आणि वित्तहानी तर होतेच पण त्या आगीत पिडीतांच्या घरांबरोबरच त्यांच्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांचीही राखरांगोळी होऊन जाते. एकाची मजा दुसऱ्यासाठी शिक्षा बनते. पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचा आहे तो ऊत्सव! नाही का? कोणाच्या सुख दु:खाशी आपल्याला काय देणे घेणे? गर्दीचा फायदा घेऊन घडणारे गुन्हे, महिलांची होणारी छेडछाड, लहान मुलांचे गर्दीत हरवणे, दारु पिऊन होणाऱ्या मारामाऱ्या, अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ आणि धिंगाणा हे नित्याचेच झाले आहे. हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा लोकमान्य टिळकांचा उद्देशच आज कुटेतरी हरवलाय किंबहुना आपण तो उद्देशच बासनात गुंडाळून ठेवलाय आणि उरलाय तो फक्त उत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला दहा दिवसांचा तमाशा.
थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे. मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच. सर्वच मंडळं असे करतात आणि सर्वच लोक या प्रकारचे समर्थन करतात असे नाही. काही मंडळे खुपच स्तुत्य कामगिरी बजावतात पण दुर्दैवाने ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी आहेत. आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे? आज जे काही आपण करतोय त्यावर अंतर्मुख होऊन पुनःविचार करण्याची वेळ आली आहे, असे कोणालाच वाटत नाही का?
खरतर अजुनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी जर ठरवले तर ही परिस्थिती बदलु शकते. ऊत्सवांवर वारेमाप खर्च केला जाणारा पैसा राष्ट्र उभारणीसाठी आणि समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सबल करण्यासाठी खर्च केल्यास टिळकांच्या गणेशोत्सव सुरू करण्यामागील मुळ उद्देशाला सफल करण्याच्या दृष्टीने हे आपले पहिले पाऊल असेल. मंगलमुर्तीच्या आगमनाने आपणा सर्वांच्या मनावर साचलेली दांभिकतेची पुटे दूर होवोत आणि सर्वांनाच सद्बुद्धी व सन्मती प्राप्त होवो हीच सदिच्छा.
मंगलमुर्ती मोरया।
0 comments