••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सिस्टरिन बाई....
पोलिओ,गवर आणि धनुर्वात बरोबरच...
एक थेंब बुद्ध ,
एक थेंब महावीर
आणि जमलंच तर
एक थेंब पैगंबर ही द्या माझ्या पोराला.
कारण
दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला....
बाळंतपणाच्या आधीच
मी माझ्या आईला बोलले,
पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ,
बाकीच्या कुठल्याबी रंगाचा आत्ता भरवसा नाय आपल्याला...
जातीच्या नाळपेक्षा,
मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची...
म्हणून नामदेवाच्या वाटीतल तूप,
तुकारामाच्या ऊसाचा रस,
नि मौलवीच्या ईद ची खीर बि प्याली म्या घटा घटा...
तरीबी वजन कमीच भरलं म्हण पोराचं
बहुतेक,
वजनाचं कारण भजनच असावं तुकोबाचं....
संचार बंदी मुळं कीर्तन, प्रवचन च झाली नाही ओ गरोदरपणात...
दोन ओव्या , चार भारुड ऐकली असती,
तर मेंदवाच वजन वाढलं असतं थोडं...
पण काळजी करू नका सिस्टरिनबाई....
फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी,
रोज तुझ्या हौदाच पाणी गरम करून
चोळून जात जा माझ्या पोराला...
धर्माचा बिर्माचा विषाणू डसू नये
म्हणून हल्ली तर न चुकता
सकाळचं पसायदान,
दुपारचं दास कॅपिटल आणि लयच
रडायल पोरगं तर संविधानाचं एखाद पान
देते मी चघळायला....
जातीची गटार तुंबायला लागली
की तापाची साथच येते माझ्या वस्तीत,
तवा कपाळावर पट्टीच ठेवते मी त्याच्या
चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवलेली.....
सिस्टरिनबाई....
पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते,
गरोदरपणा परीस
जातीच्या कळा लई वाईट बघा...
म्हणून निरोप द्या माझा....
जलमाचा दाखला लिवणाऱ्या सायेबाला ,
धर्म आणि जात यांचा रकाना
रिकामाच सोड म्हणावं त्याला.
कारण, दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला...
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
काळजाला भिडणारी,
संवेदनांची परिसीमा गाठून सतत विचार करायला लावणारी हि कविता आहे...☝
https://drive.google.com/folderview?id=0Bz9C0ysJZ7PnMGZKeWcybUpXWGM&usp=sharing#
🙏🙏🙏🙏🙏
मालकानं बैलासमोर गव्हाणीत पेंडीचा पीळ मोकळा केला तसा रवंथ करत बसलेला बैल उठून उभा राहिला, मालक गोठ्याच्या बाहेर गेल्याची खात्री करून बकरं आत शिरलं.. आडव्या मेढीवर गोठ्यात 'तपश्चर्या' करत बसलेलं कोंबडं उडी मारून गव्हाणीत येऊन बसलं.. इकडेतिकडे पहात एक उंदीर गव्हाणीत येऊन बसला अन रोजची 'गोलमेज परिषद' सुरू झाली... सुखदुःखाच्या गप्पा मारत-मारत.. बैल कडब्याच्या पेंडीतली चिपाडं, पान-पान शोधून बकरं, एखाददुसरे राहिलेले कणीस शोधत कोंबडं तर गव्हाणीत पडलेले ज्वारीचे दाणे अन सुग्रासवर उंदीर ताव मारण्यात दंग झाले..!
अगदी दृष्ट लागावी अशी एकी...
चौघेही आनंदात जगत होते...
चारही जण जिवलग मित्र, वेगवेगळ्या संवर्गात असले तरी शेवटी सर्व प्राणीच...! एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार ! नास्ता,लंच अन डिनर एकत्र करणारे अन मालकाच्या सदैव चाकरीत असणारे, प्रामाणिक असणारे...!!
सकाळची न्याहरी आटोपली अन उंदीर आपल्या नित्यनियमाप्रमाणे घराची परिक्रमा करायला निघाला...!
मित्रांच्या संगतीमुळे मालकाला त्रास होईल असे तो अजिबात वागत नव्हता..!
पण त्याला आज अचानक एक धक्का बसला.. थरथर कापू लागला.. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला....
'अहो.. एक उंदीर रोज दिसतोय हो.. कुठं काही नुकसान नाही पण त्याचा वेळीच बंदोबस्त करा !' ओसरीत पेपर वाचत बसलेल्या मालकाच्या हातात चहाचा कप टेकवत मालकीण बोलल्या...!
'अगं व्हय की, म्या पण त्याला पाहिलंय.. आज बाजारातून येतांना पिंजरा घेऊन येतो..!'
उंदीर भेदरलं... परिक्रमा विसरलं... अन थेट गोठ्यात मित्रांकडे धाव घेतली...
गोठ्यात फक्त कोंबडं होतं, ' दादा..दादा.. !'
'काय झालं रे ? एवढी धाप का लागली ? एखादा बोक्या लागला का पाठी ??' कोंबडं हसतच बोललं.
'नाय पण मालक माझ्यासाठी पिंजरा आणणार हाय म्हण.… त्यांच्या तोंडून ऐकून आलोय !' उंदीर आवंढा गिळत बोललं.
'मग ??' कोंबडं.
'भाऊ मला वाचवा !' आर्त स्वरात उंदीर बोलत होतं.
'नाय बा, पिंजरा तुझ्यासाठी आहे अन 'समस्या' पण तुझीच आहे... तुझी तू निपट !' कोंबडं अंग झटकत बोललं !
पडलेल्या चेहऱ्यानीशी उंदीर आपली 'समस्या' घेऊन गोठ्याबाहेर चरत असलेल्या बकऱ्याकडे गेला..!
बकऱ्याने सर्व हकीकत गंभीरपणे ऐकून घेतली.. अन गालातल्या गालात हसला..
'लावू दे मालकाला पिंजरा.. त्याने काय होतंय ? तू फक्त पिंजऱ्यात जाऊ नको ! चिल्लर गोष्टींसाठी माझा वेळ खाऊ नको..! तुझे कोडे तूच सोडव.. पुन्हा त्रास देऊ नको ..!!'
खाडकन तोंडात चपराक बसल्यावर जसा चेहरा होतो तसा चेहरा घेऊन तो शेतात चरत असलेल्या अनुभवी वयस्कर बैलाच्या दिशेने आपल्या सर्व आशा, आकांक्षा अन अपेक्षा घेऊन धावला...!
बैलाने त्याची सर्व 'समस्या' ऐकली.. समस्या ऐकेपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला....
'त्याचं कसं आहे उंदीर भाऊ, मी आहे पाळीव, अन त्यात 'मालकाच्या दावणीला' बांधलेला..! तुला मदत करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे पण.... थोडंस अवघड वाटतंय..! तसं मी मालकाला बोलून बघतो... तू उद्या भेट..!' बैलाची ही प्रतिक्रिया ऐकून त्याचा मैत्रीवरचा विश्वासच उठला...!!
सायंकाळ झाली....
मालक गोठ्यात शिरले... मालकीण मागेच होती... मालकाच्या हातात 'उंदराचा पिंजरा होता!' मालकीनीच्या सांगण्यावरून त्याने तो दगडाच्या पवळीला असलेल्या भगदाडाजवळ लावला.. उंदराची जाय - यायची वाट तीच तर होती...
पिंजरा लावून मालक मालकीण निघून गेले...
उंदराने गव्हाणीच्या साक्षीने सर्वसमोर एक आर्त मागणी केली...
-- 'तुम्ही सर्व माझे आधारस्तंभ आहात, माझं भवितव्य तुमच्या हातात आहे... मी तुमच्यापैकी एक आहे.. आज संकट माझ्यावर ओढवलंय उद्या तुमच्यावर ओढवेल कृपया मदत करा, मला वाचवा !' तो मनातून विनंती करत होता...!
पण सर्वजण त्याला हेतुपुरस्कर टाळत होते ..!
"दोस्त दोस्त ना रहा....!!" गाणे बॅकग्राऊंड ला वाजत होते...!
हताश अन निराश होऊन उंदीर निघाला...!
पवळीच्या भगदाड जवळ लावलेल्या पिंजऱ्याकडे हताश नजरेने पहात अन कालपर्यंत 'संघटनेत, एकीत अन समूहात असणाऱ्या बळाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी 'समस्या तुझी-अन-उपाय तूच शोध !' असा उपदेश करत अनेक दिवसाची मैत्री क्षणात तोडली होती..!!
दावणीतले 'पाळीव' अन हा 'उपरा' असे दोन भाग स्पष्ट झाले होते...!!
उंदराने जागा बदलली, मेढीवर तुराट्याच्या काड्यावर गवत अंथरून तिथे तो झोपू लागला.. तशी पडण्याची भीती होती पण पिंजऱ्यात अडकून मरण्यापेक्षा हे बरं ... !
रात्र झाली होती.... अचानक गोठ्यातून खडखड असा आवाज येत असल्याने मालकीणबाई आल्या.. 'नक्की पिंजऱ्यात उंदीर अडकला असेल...' गोठ्यात आल्या.. थोडासा अंधार असल्याने दिसत होते... अंदाज बांधत सकाळी ठेवलेल्या पिंजऱ्याच्या दिशेने पुढे सरकल्या... जिकडे हालचाल जाणवत होती तिकडे पिंजरा थोडासा अस्पष्ट दिसला म्हणून तिने तो पिंजरा उचलला.... अन तितक्यात तिला काहीतरी चावल्याची जाणीव झाली म्हणून तिने पिंजरा फेकून दिला..!
पिंजऱ्यात अर्धवट आत अन अर्धवट बाहेर अशा अवस्थेत 'विषारी साप' अडकला होता !!
मालकीण दवाखान्यात शरीक झाली... मालकाने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले... खूप पैसा लावला...
काही दिवस निघून गेले... मालकीण दवाखान्यात अन मालक दिवाळखोर...!
एक दिवस मालक गोठ्यात शिरला.. त्याच्या मागोमाग एक माणूस... मालकाने कोंबड्याला आवाज दिला अन पकडले अन सोबत आलेल्या माणसाशी सौदा करून त्याच्या हवाली केले... अत्यंत हताश नजरेने मित्रांकडे पाहत जीवाचा आकांडतांडव करत कोंबड्याने मित्रांचा निरोप घेतला..!
उंदीर सर्व वर बसून पहात होता...
चार दिवस उलटले....
पुन्हा मालक अन तोच माणूस गोठ्यात शिरले.... बकऱ्याच्या पाठीवर त्याने हात फिरवला तसं बकरं थरारलं... त्याला घाम फुटला... उजव्या हाताने त्याने बकऱ्याच्या पोटाजवळच्या फासळीत दाबले अन मालकाशी बोलून सौदा पूर्ण केला.. मालकाच्या हातावर पैसे टेकवत बकऱ्याला सोबत घेऊन निघाला....
बकऱ्याच्या आकांताबरोबरच बैलाच्या डोळ्यातून दोन अश्रू टपकले....
पुन्हा आठ दिवस निघून गेली...
मालक गोठ्यात शिरले ... आज त्यांच्या बरोबर दोन माणसे लुंगी, बनियन अन टोपी परिधान करून होती..
गोठ्यात बैलाशिवाय कोणीच नव्हते.. तो शहारला... थरथरू लागला... त्याचाही सौदा झाला अन तो ही जड पावलांनी गोठ्याबाहेर पडला....
मेढीवरून पाहणाऱ्या उंदराच्या डोळ्यात अश्रू तरळले...!
जिच्या इलाजासाठी सर्व गोठा रिकामा झाला ती मालकीण पण वाचली नाही...!
..
...
जे कालपर्यंत म्हणत होते की, 'ही समस्या आमची नाही... तुझी समस्या आहे अन तू उपाय पहा..!' नेमके तेच आज त्या समस्येचे 'योग्य वेळी' निराकरण न केल्याने 'साफ' झाले होते... अन 'समस्या' ज्याची होती, तो आज आपल्या अढळ ठिकाणी विराजमान होता..!
वेळीच " कोंबडा अन बैलाच्या आवाजाच्या गजरात बैलाने पिंजऱ्यावर आपल्या दमदार खुरांचा पाय ठेवून पिंजरा मोडला असता तर 'मैत्री' पण अबाधित राहिली असती अन 'स्वतःचे अस्तित्व पण !' ..."
समस्या लहान भावाची असो, मोठ्या भावाची असो, बहिणींची असो वा सर्वसमावेशक असो ... समस्या कोणाची का असेना ... आज त्या समस्यात तो गुरफटलाय... उद्या आपण गुरफटू नये म्हणून 'कितीही छोटी.. कदाचित आपली नसली तरी.. त्यांना साथ द्या ! त्यांना जगवा अन स्वतः दुसऱ्यांसाठी जगा !!'
"स्वतःसाठी जगणे.. मरणासम आहे !!"
कदाचित आपली अवस्था वरील कथेप्रमाणे होऊ नये.... 'समस्या जागच्या जागीच... अन आपण साफ....