दि ग्रेट गामा

Tuesday, February 21, 2017

पन्नास वर्षे तो कुस्ती खेळला. जगभरातल्या पहिलवानांना त्याने खूले आव्हान दिले. शेवटपर्यंत अपराजित राहिला. जगातला एकमेव पहिलवान, जो आयुष्यात एकदाही कुस्ती हरला नाही.
सगळं काल्पनिक वाटतंय ना ? पण सत्य कल्पनेपेक्षाही अचाट असते.

बावीस मे अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे त्याचा जन्म झाला. काश्मिरी मुस्लिम बट घराणे. पहिलवानीचा वारसा होताच. पंजाबच्या माधोसिंह या गुरूकडे कुस्तीचे धडे गिरवले.  मोठ मोठ्या मैदानात पठ्ठ्याने अचाट शारिरिक कसरत करून दाखवली. राजाची नजर पडली. दतियाच्या महाराजांनी राजाश्रय दिला. याची कुस्ती भरात आली. त्याने बघता बघता देशभरातले सर्व नामंकित मल्ल लोळवले. आणि एकोणिसाव्या वर्षी याची नजर रूस्तम ए हिंद रहिमबक्ष सुलतानीवाला वर पडली. याने रहिमबक्ष ला आवाज दिला. साल होतं अठराशे पंचान्नव. रहिमबक्ष सात फूट उंचीचा, हा पाच फुट सात इंच. रहिमबक्षबरोबरची कुस्ती दिर्घकाळ चालली, पण शेवटी बरोबरीत सुटली.  हा पठ्ठा पुर्ण देशभर प्रसिद्ध झाला. १८९८ ते १९१० पर्यंत याने रशियाच्या गुलाम मोहम्मोदिन, भोपाळ च्या प्रतापसिंह, मुलतानच्या हसनबक्ष या नामवंत मल्लांना चितपट केले होते. १९१० ला पुन्हा रूस्तम ए हिंद रहिमबक्ष बरोबर कुस्ती धरली. पुन्हा कुस्ती दिर्घकाळ चालली. बरोबरीत सुटली. पण या वेळी याने रहिमबक्ष ला चांगलाच दमवला होता. हा देशभरात कुठल्याच पहिलवानाला चित होत नव्हता. जो सर्वोच्च पहिलवान होता त्याच्याबरोबरचीच कुस्ती बरोबरीत सुटत होती.

देशभरात जोड मिळेना. वैतागून हा  इंग्लंड ला गेला. जॉन बुल बेल्ट चॅंपियनशिप चे स्वप्न होते त्याचे. पण उंची होती पाच फूट सात इंच. कमी उंचीमूळे त्याला स्पर्धेत घेतले नाही. मग याने सगळ्यांनाच उघड चॅलेंज दिले. कोणताही पहिलान, कुठल्याही वजनगटाचा असो,  मी तेरा मिनिटात उचलून फेकतो. सुरूवातीला लोकांना हा प्रसिद्धीसाठीचा डाव वाटला. त्यावेळी स्टेनिलॉलॉस झिबीयस्को व फ्रॅंक रोज हे दोन टॉपचे पहिलवान होते. बेंजामिन रोलर ने याचे चॅलेंज स्विकारले.केवळ  पंधरा मिनीटात तेरा वेळा याने  बेंजामिनला उचलून पटकला. मग वर्ल्ड चॅंपियन झिबियस्कोने त्याचे आव्हान स्विकारले. १० सप्टेंबर १९१० च्या दिवशी दोन तास पस्तीस मिनीटे ही कुस्ती चालली. शेवटी बरोबरीत सुटली. दूसरी कुस्ती १९ सप्टेंबरला ठरली पण झिबियस्को आलाच नाही.

जॉन बुल बेल्ट चा खिताब खिशात घालून १९११ मध्ये  मग तो परत आला. पुन्हा रहिमबक्ष बरोबर कुस्ती धरली.यावेळी  रहिमबक्ष ला चित करून रूस्तम ए हिंद चा खिताब हुसकावून घेतला.  १९२७ ला स्विडनच्या जेम्स पिटरसन ला हरवणारी शेवटची कुस्ती तो खेळला.
रोज पाच हजार बैठका, तीन हजार जोर मारायचा. दहा लिटर दूध, सहा देशी कोंबड्या, अर्घा किलो तूप, बदाम असा त्याचा खूराक होता. पंचान्नव किलोचं दगडी जातं गळ्यात घेवून तो बैठका मारायचा. बाराशे किलोचा दगड उचलायचा. हे साहित्य अजूनही म्युझियममध्ये जतन करून ठेवलंय, त्याची आठवण म्हणून.

सात फूटाच्या रहिमबक्ष ला हरवून रूस्तम ए हिंद झाला. शेर ए पंजाब, रूस्तम ए जमां ,  असे खिताब पटकावून शेवटी तो दि ग्रेट गामा झाला. देशाचे नाव जगभर करणारा, आपल्या देशात असा सुपर ह्युमन होवून गेला, याची कितीजणांना माहिती आहे?  एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला. गामा पाकिस्तानात गेला. त्याचे शेवटचे दिवस वाईट होते. रावी नदीच्या कडेला एका झोपडीत तो रहात होता. आजारी, हालाखीत. मिळालेले मेडल्स विकून तो कसाबसा जगत होता. पटियालाचे महाराज, बिर्ला बंधू यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला होता. एकोणीसशे त्रेसष्ठ साली या अवलियाने देह सोडला. एका अख्यायिकेचा अंत झाला ….

एक दुर्मिळ रत्न पाकिस्तानच्या मातीत, मातीमोल झालं.....

You Might Also Like

0 comments