सराव सामन्यात भारताचा 106 धावांनी पराभव
Sunday, February 08, 2015
ऍडलेड - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आज
(रविवार) झालेल्या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांप्रमाणेच फलंदाजांनीही
शरणागती पत्करली आणि अवघ्या 265 धावांत भारताचा डाव गुंडाळला आणि भारताला
106 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन
मॅक्सवेल यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 372 धावांचे अवघड
आव्हान ठेवले होते.
भारताच्या वतीने रहानेने 52 चेंडूत 66 धावा
केल्या. तर शिखर धवन याने 71 चेंडूत 59 धावा आणि रायडूने 42 चेंडूत 53 धावा
जमविल्या. त्यानंतर कोणालाही सूर गवसला नाही. कर्णधार महेंद्रसिंह धोनी
पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या वतीने कमिन्सने सर्वाधिक तीन
बळी तर स्टार्क, जॉन्सन आणि हजलवूडने प्रत्येकी दोन बळी टिपले. तिरंगी
एकदिवसीय स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे
आजच्या सामन्यात सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड होते. कसोटी
मालिकेत गोलंदाज अपयशी ठरले होते, तर तिरंगी स्पर्धेत फलंदाजांनीही निराशा
केली होती. आजच्या सराव सामन्यातही भारताच्या गोलंदाजांच्या सुमार
कामगिरीने ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा
कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन
भारतासमोर 372 धावांचे लक्ष्य ठेवले.
डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच
यांनी अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरुवात केली. पण, फिंच 20 धावांवर
स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वॉटसनच्या साथीने
वॉर्नरने संघाचे शतक पूर्ण केले. पण, मोहित शर्माच्या पहिल्याच षटकात वॉटसन
पटेलकडे झेल देऊन बाद झाला. स्टिव्ह स्मिथ या सामन्यात आपली लय कायम ठेवू
शकला नाही. त्याला उमेश यादवने त्रिफळाबाद केले. अखेर कर्णधार बेलीच्या
साथीने वॉर्नरने आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरने भारताविरुद्धची आपली
सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली. वॉर्नर आणि बेली ठरविक अंतराने बाद
झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तळाच्या फलंदाजांच्या साथीने आक्रमक फलंदाजी
करत धावांचा डोंगर उभा केला. मॅक्सवेलने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 53
चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. अखेर
त्याने 122 धावांवर असताना निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या
खेळीत 8 षटकार आणि 11 चौकार खेचले. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी
गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी मिळविले. तर, उमेश यादव आणि मोहित शर्माने
प्रत्येकी दोन बळी मिळविले. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या
पराभवामुळे क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
0 comments