दुष्काळात तेरावा महिना
Tuesday, March 03, 2015
दुष्काळात तेरावा महिना,
अशी अवस्था अवकाळी पावसाने केली. जे काही रब्बीचे पीक हाती पडणार होते,
त्याच्यावर पाणी फिरले. जुलै-आॅगस्टमध्ये पाऊस दगा देतो म्हणून खरीप जाते
आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी फटका देतो म्हणून रब्बीची वाट लागते. हे
ऋतुचक्र स्थिर होऊ पाहते आहे. गेल्या वर्षी गारपिटीने तर शेतकऱ्यांची कंबरच
मोडली होती. आता गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. मराठवाडाभर
आंबा मोहराने फुलला होता. मोहर फुटला नाही असे झाड सापडत नव्हते. दुष्काळात
ती एक आशा पल्लवित झाली होती; पण मोहर, बाळकैऱ्यासुद्धा या पावसाने झडून
गेल्या. खरिपाचे पीक दुष्काळामुळे गेले म्हणून दोन महिन्यांपूर्वी ८० टक्के
म्हणजे १६९० कोटींचे अनुदान शेतकऱ्यांसाठी आले होते. त्यापैकी ५१६ कोटींचे
वाटप अजून झालेले नाही. शेतकऱ्यांची बँक खाती क्रमांक प्रशासनाने न
दिल्यामुळे त्यांचे वाटप बँकांना करता आले नाही. दोन महिन्यांपासून हे पैसे
पडून आहेत. हे मार्गी लागले नसतानाच पुन्हा अवकाळी पाऊस अवतरला आणि नुकसान
झाले. त्यासाठी सरकार काय करणार? कारण हे शेतकऱ्यांवरील दुसरे संकट. या
अशा दुष्टचक्रामुळे मराठवाड्यातील शेती संकटात आली. शेतकऱ्यांच्या
आत्महत्त्या थांबायला तयार नाहीत आणि आता तर आत्महत्त्यांसारख्या घटनांकडे
गांभीर्याने पाहिले जात नाही. खेड्यांमध्ये काम नसल्याने स्थलांतर सुरू
झाले आहे. ‘मनरेगा’ची कामे असली तरी स्थलांतर होणे हे काही चांगले लक्षण
नाही. आताही रब्बीसाठी अनुदानाची घोषणा होईल; पण अनुदान म्हणजे मलमपट्टी.
यातून शेतकरी उभा राहू शकत नाही. शेतमालाला भाव नाही; पण महागाई वाढली आहे.
शेतात उत्पन्न नाही आणि निसर्ग साथ देत नाही, अशा कोंडीत तो सापडला आहे.
स्वाइन फ्लूची दहशत
अवकाळीच्या आपत्तीने आणखी एक संकट गडद झाले आहे. ते आहे स्वाइन फ्लूचे.
गेल्या दीड महिन्यापासून याने मराठवाड्यात हातपाय पसरायला सुरुवात केली.
हिंगोली वगळता सर्वच जिल्ह्यांत याची लागण झाली. औरंगाबादमध्ये आजवर नऊ जण
दगावले. पत्रकार रमेश राऊत यांचाही बळी स्वाइन फ्लूने घेतला. मराठवाडाभर
रोजच रुग्णांची संख्या वाढत आहे. या साथीने लोकांमध्ये एक प्रकारची दहशत
निर्माण झाली. स्वाइन फ्लूची खबरदारी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. सरकारने
उपचाराची व्यवस्था केली; पण जनजागृतीमध्ये ते कमी पडताना दिसते.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २५ जण; त्यात
एकट्या लातूर जिल्ह्यातील ११ जण आहेत. यावरून ही साथ किती पसरत आहे याचा
अंदाज येतो. लातूर हे व्यापारी ठिकाण, तसेच सीमावर्ती भागातील शहर.
त्यामुळे रोज येणाऱ्या लोकांची संख्या जास्त. त्यामुळेच साथ पसरली. गेल्या
दोन दिवसांपासूनचे पावसाळी वातावरण हे स्वाइन फ्लूला पोषक समजले जाते.
पावसामुळे आणखी आठवडाभर तरी थंडी राहील आणि साथ पसरण्यास त्याचा हातभार
लागेल. यासाठी आताच व्यापक प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजेत.
मरगळ दूर होईल
विलासराव देशमुख यांच्यानंतर राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अशोक
चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही मराठवाड्यातील
मरगळलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह आणणारी घटना म्हणावी लागेल. पराभवामुळे
काँग्रेसमध्ये आलेली मरगळ अशोक चव्हाण दूर करतील आणि भाजपाचा आक्रमकपणे
मुकाबला करतील आणि चव्हाण-दानवे हा मुकाबला राज्याच्या राजकारणाला रंग
आणणार, यात शंका नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे चालू असलेल्या उत्खननाची जाता जाता दखल
घेणे अपरिहार्य आहे. तेरचा इतिहास हा सातवाहन काळातील समृद्ध शहर, रोमशी
व्यापारी संबंध असलेला. आजवर येथे तीन वेळा उत्खनन झाले. आता उत्खननात हे
समृद्ध शहर तेरणा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले, असा प्राथमिक अंदाज
यावेळी आला. इतिहासतज्ज्ञांना सातवाहनपूर्व काळातील काही हाती लागते का
याची आस आहे.
- सुधीर महाजन
0 comments