तुमच्यातले खरे कोण?
Tuesday, March 03, 2015-
एखाद्या घराचा प्रमुख
लोकांना एक चांगली गोष्ट सांगत असेल आणि त्याच्या परिवारातील बाकीची माणसे
नेमकी त्याच्या विपरीत बोलताना दिसत असतील तर आपण त्यातल्या कुणाचे म्हणणे
खरे मानायचे असते? त्या प्रमुखाचे की त्याच्या परिवाराचे? राष्ट्रपतींच्या
संसदेतील अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशाच्या ऐक्याविषयी, त्यातील सामाजिक सलोख्याविषयी आणि त्या साऱ्यांना
आधार देणाऱ्या देशाच्या संविधानाविषयी अतिशय गौरवशाली उद्गार काढले.
भारताचे संविधान हाच देशाचा धर्मग्रंथ आहे असे सांगून त्या ग्रंथाशी विपरीत
असणारे आपण काहीही खपवून घेणार नाही असे चौरस आश्वासनच आपल्या भाषणात
त्यांनी देशाला दिले. धार्मिक वेगळेपणा नाकारण्याची व आपल्या धर्माची सक्ती
कोणा समाजावर करण्याची आणि दोन समाजात दुही पेरण्याची कोणतीही बाब माझे
सरकार चालू देणार नाही अशी आश्वासक भाषा त्यांनी त्या भाषणात वापरली.
त्यांच्या मागे बसलेल्या भाजपाच्या खासदारांनी त्या वक्तव्याचे बिचकत का
होईना पण टाळ्या व बाके वाजवून स्वागत केले, तर समोर बसलेले विरोधक ते
भाषण कमालीच्या साशंकतेने ऐकताना दिसले. देशाचा पंतप्रधान शब्द देतो आणि
त्याच्या खरेपणाविषयी त्याच्या पक्षाएवढाच विरोधकांतही संशय राहतो ही गोष्ट
नेतृत्वाची उंची व वजन कमी करणारी आहे. नरेंद्र मोदी हे ज्या संघ
परिवारातून आले आहेत तो परिवार नेमके मोदींच्या विरोधात जाणारे वर्तन करतो
आणि तशीच वक्तव्येही देतो. संविधानाने भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र
असल्याचे स्वच्छपणे सांगितल्यानंतरही मोदींच्या संघ परिवाराचे प्रमुख मोहन
भागवत त्याला हिंदू राष्ट्र म्हणतात. या देशातले सगळेच अन्य धर्मी कधीकाळी
हिंदू होते व त्यांनी घरवापसी केली पाहिजे असे म्हणतात. त्याच परिवारातील
सिंघल आणि तोगडिया हे पुढारी जास्तीच्या आक्रमक भाषेत बोलून या घरवापसीच्या
सक्तीची भाषा करतात. (अशा वेळी संघावर आमचे नियंत्रण नाही हे भाजपाचे
सांगणे विश्वसनीय ठरत नाही. संघाशी असलेला त्याचा जैविक संबंध व संघाचे
त्याच्यावर असलेले नियंत्रण भाजपला नाकारता येणे शक्यही नाही.) असीमानंद
नावाचा संघ पुरुष मारुतीचे मुखवटे वाटून ‘वनवासीं’वर आपला धर्म लादत असतो,
तर निरंजना नावाची मोदींच्या मंत्रिमंडळातील एक स्त्री देशातील जनतेचे
विभाजन ‘रामजादे’ आणि ‘हरामजादे’ अशा असभ्य शब्दात करीत असते. ‘मोदींना व
संघाला न मानणाऱ्यांनी देश सोडून चालते व्हावे’ अशी धमकी उत्तर प्रदेशचा
भाजपा खासदार आदित्यनाथ देतो, तर साक्षीबुवा नावाचा दुसरा खासदार संघाला न
मानणाऱ्यांना देशात स्थान नाही असे म्हणतो. ‘मोदींना निवडून द्यायचे तर
प्रत्येक हिंदू स्त्रीने दहा पोरे जन्माला घातली पाहिजेत’ असे एक
शंकराचार्य म्हणतो, तर त्याच्या परिवारातील इतर काहीजण पोरांची ही संख्या
चार ते सहापर्यंत नेण्याचे सांगताना दिसतात. या साऱ्यांच्या मनात असलेला
मुसलमान व ख्रिश्चन धर्मीयांविषयीचा द्वेष थेट युद्धपातळीवरचा आहे. देशातील
इतर धर्मांविषयीही त्यांना आस्था नाही. पण त्यांच्याविरुद्ध न बोलण्याचे
राजकारण सांभाळणे त्यांनी जपले आहे. मदर तेरेसा या जगाने गौरविलेल्या
समाजसेविकेविषयीचा संशय व्यक्त करणारी भाषा भागवतांनी नुकतीच वापरली.
त्यावर टीका होताच त्यांचे म्हणणे संदर्भ सोडून वापरले गेल्याची मखलाशीही
त्यांच्याच संघटनेकडून करण्यात आली. ‘मी सर्व भारतीयांचा आणि त्यांच्या
धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करतो’ असे मोदींनी याआधीही एकदा म्हटले आहे.
त्याची खिल्ली उडवताना विहिंपच्या एका पुढाऱ्याने ‘मोदींचे ते वक्तव्य
आमच्यासाठी नसून ख्रिश्चनांसाठी आहे’ असे सांगून टाकले. दिल्लीत
ख्रिश्चनांच्या पूजास्थानांवर हल्ले झाल्यानंतरची ही बाब आहे. ओडिशा,
कर्नाटक आणि बिहारमध्येही अशा घटना घडल्या. पण माध्यमांनी व सरकारने त्या
यशस्वीपणे दडपल्या. याच काळात भाजपाच्या मध्य प्रदेश सरकारने शाळांमध्ये
सूर्यनमस्कार आवश्यक ठरविले. छत्तीसगडने भगवत्गीता अभ्यासक्रमात आणली आणि
गुजरातने सगळ्या सरकारी शाळांमधून सरस्वतीपूजन बंधनकारक ठरविले. हा प्रकार
कर्मठ हिंदूंना आवडणारा असला, तरी धर्मनिरपेक्ष हिंदू व अन्य धर्मीयांना तो
सक्तीचा वाटावा असाच आहे. खुद्द मोदींविषयीच संशय व्यक्त करावा अशी एक
बाबही येथे नोंदविली पाहिजे. दिल्लीतील शीखविरोधी दंगलीत ठार झालेल्या
साडेतीन हजार निरपराध लोकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे
त्यांच्या सरकारने जाहीर केले. अकाली दलाशी असलेली भाजपाची राजकीय मैत्री
हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र अशीच मदत २००२ च्या गुजरात दंगलीत
मारल्या गेलेल्या दोन हजारांवर मुसलमानांना देण्याची बुद्धी मोदींच्या
सरकारला होत नाही. दंगलीत मरणाऱ्यांना द्यावयाची मदतही त्यांची जात वा धर्म
पाहून सरकार देणार असेल, तर - घटना हा आमचा धर्मग्रंथ आहे - या
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विश्वास तरी किती व कुणी बाळगायचा? अशावेळी
पडणारा प्रश्न हा की, तुमचे वक्तव्य खरे, की तुमच्या परिवाराचे वागणे खरे?
आणि दुसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे, की सरसंघचालक मोहन भागवत
खरे?
0 comments