कॉस्मेटॉलॉजीतलं करिअर

Monday, March 09, 2015

cosmatology
सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर

सौंदर्य प्रसाधनं आणि सौंदर्यासंबंधित उपचारपद्धतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कॉस्मेटॉलॉजी. याच क्षेत्रातील करिअरविषयी...

कॉस्मेटोलॉजिस्ट किंवा ब्युटिशियन म्हणून काम करण्यापूर्वी विविधप्रकारच्या सौदर्यविषयक उपचार प्रकियांचा अभ्यास करावा लागतो. कॉस्मेटॉलॉजी या क्षेत्रात हेअरस्टायलिंग, स्किनकेअर, कॉस्मेटिक्स, पेडिक्युअर, मेनिक्युअर आणि इलेक्ट्रोलॉजी अशा विविध शाखांचा समावेश होतो. कॉस्मेटॉलॉजीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर हेअरस्टायलिस्ट, हेअर ड्रेसर्स, शॅम्पूअर, बार्बर, स्किनकेअर स्पेशालिस्ट आणि नेल टेक्निशियन म्हणून काम करता येईल.

याप्रकारची कामं करताना केस कापणं, केसांना छान आकार देणं (रीशेपिंग/ट्रीमिंग), मेनिक्युअर (हातांच्या सौंदर्याची काळजी घेणे), पेडिक्युअर (पायांच्या सौंदर्याची काळजी घेणे), कृत्रिम नखं लावणे, खासप्रसंगी करायच्या केशभूषा (हेअरस्टाइलस), केसधुणे, सौंदर्य प्रसाधनांचा वापर, शरीरावरील नको असणारे केस काढणं, हेअर स्ट्रेटनिंग, कायमस्वरुपी वेव्हज, केसांना रंग लावणं (कलरिंग), हायलायटनिंग, हेअरएक्सटेन्शन (केस कृत्रिमरित्या वाढवणं) व विग आदी विविध प्रकारच्या उपचार पद्धतींवर काम करावं लागतं. कॉस्मेटॉलॉजी क्षेत्राचं/ विषयाचं लायसन्स (परवाना) असणा‍ऱ्या व्यक्तीला कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हटलं जातं.

कॉस्मेटोलॉजिस्ट आपलं व्यावसायिक सॅलॉन सुरु करुन तिथे विविध प्रकारच्या सौदर्यविषयक उपचार पद्धती देण्याचं काम करु शकतो. अशा सॅलॉनमध्ये फक्त प्रशिक्षित व्यक्तीच उपचारपद्धती देतात.

स्पेशलायझेशन्स :

ब्युटिशियन - चेहरा आणि मानेच्या सौंदर्याची काळजी घेणारे तज्ज्ञ

नेल टेक्निशियन / मेनिक्युअरिस्ट्स आणि पेडिक्युअरिस्ट्स - पेडिक्युअर, मेनिक्युअर, नेल कलरिंग आणि नेल एक्सटेन्शन्स आदी कामे करतात.

मेनिक्युअरिस्ट्स आणि पेडिक्युअरिस्ट्स - मेनिक्युअर (हातांच्या सौंदर्याची काळजी घेणे), पेडिक्युअर (पायांच्या सौंदर्याची काळजी घेणे) ही कामं हे तज्ज्ञ करतात.

हेअर ड्रेसर्स आणि हेअर स्टायलिस्ट - हेअर शॅम्पूइंग (केस धुणे), कटिंग (केस कापणे), कलरिंग (केसांना रंग लावणे) आणि स्टायलिंग (विविध केशभूषा) आदी अनेक कामे हेअर ड्रेसर्स आणि हेअर स्टायलिस्ट्सना करावी लागतात.

इलेक्ट्रॉलॉजिस्ट (एपिलॅटोमिस्ट) - शरीरावरील नको असलेले केस विविध उपचार पद्धतींनी काढणारे तज्ज्ञ

स्किन केअर स्पेशालिस्ट- फेशिअल, मसाज आणि इतर स्किन केअर ट्रीटमेंट्सच्या माध्यमातून आपल्या त्वचेला स्वच्छ आणि सुंदर बनवणं तसंच, त्वचेचा पोत सुधारण्याचं काम हे तज्ज्ञ करतात.

मसाजर- हे तज्ज्ञ चेहरा आणि शरीराला मसाज करतात.

अरोमाथेरपिस्ट - अरोमॅटिक (सुवासिक) तेलांनी मसाज करणारे तज्ज्ञ.

मेडिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट्स - आपल्या शरीराची बाह्य काळजी घेणारे हे तज्ज्ञ प्रथम फिजिशियन म्हणून ओळखले जातात. रुग्णांच्या आजारांचं निदान करत त्या अनुषंगाने योग्य असे उपचार देऊन रुग्णांच्या आरोग्याची काळजी यांना घ्यावी लागते. लायपोसक्शन, शरीरावर असणारे वैगुण्य दुरुस्त करणा‍ऱ्या सर्जिकल प्रकिया ते करतात. या उपचारपद्धतींना 'रीशेप' व 'करेक्टिंग अॅबनॉर्मलिटीज' म्हणतात. याशिवाय पील ऑफ, बोटॉक्स, थ्रेड लिफ्ट अशा नॉन सर्जिकल प्रकियाही ते करतात. आपल्या त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी या नॉनसर्जिकल प्रकिया केल्या जातात.

या क्षेत्रातील प्रवेश :

कॉस्मेटॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण तुमच्याकडे असायलाच हवं असं नाही. या क्षेत्राचं प्रशिक्षण देणारे विविध डिप्लोमा आणि इतर कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्स करताना मग तुम्हाला ब्युटी थेरपी, हेअर स्टायलिंग, मेकअप, मसाज, फेशिअल, नेल आर्ट, अरोमा थेरपी, इलेक्ट्रोलायसिस आणि हर्बल ब्युटी केअर यापैकी कोणतेही स्पेशलायझेशन करता येईल.

करिअरच्या संधी :

फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेल्स आणि फॅशन स्टार्सना ग्रूम करण्यासाठी कॉस्मेटॉलॉजिस्टची गरज असते.

ब्युटीपार्लर्स, ब्युटी सॅलॉन्स, पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, स्पा, आपलं स्वत:चं ब्युटी सॅलॉन किंवा ब्युटी क्लिनिक सुरु करता येईल.

कॉस्मेटिक कंपन्यांमध्ये ब्युटी एक्झिक्युटिव्ह, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ब्युटी अॅडव्हायझर /कन्सल्टंट किंवा सेल्सपर्सन म्हणून काम करता येईल.

जाहिरात, चित्रपट, टीव्ही आणि नाटक इंडस्ट्रीमध्ये

वर्तमानपत्रे, मासिके आणि वेब प्रकाशनांमध्ये कन्सलटंट कॉस्मेटॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून लेखन करता येईल.

या क्षेत्रातलं प्रशिक्षण देणा‍ऱ्या संस्था :

अनेक वुमेन्स पॉलिटेक्निक्स तसंच व्होकेशनल आणि खासगी संस्थांमध्ये ब्युटी केअर /कॉस्मेटॉलॉजीचे मान्यताप्राप्त कोर्सेस उपलब्ध आहेत.

त्यापैकी काही पुढील प्रमाणे -

रीजनल व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर वुमेन, मुंबई

एल टी ए स्कूल ऑफ ब्युटी www.ltaindia.org

व्ही एल सी सी इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड न्यूट्रिशन www.vlccinstitute.com

You Might Also Like

0 comments