वंशपरंपरा विरुद्ध लोकशाही
Monday, March 09, 2015-
संसदेतील अर्थसंकल्पीय
अधिवेशनास अनुपस्थित राहणारे आपले उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या या
निर्णयाबद्दल व सध्या ते कुठे आहेत याबद्दलही कमालीची गुप्तता बाळगणाऱ्या व
संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या
उपाध्यक्षाच्या गैरहजेरीतच रालोआला सामोरे जाणे भाग पडते आहे. पक्षाचे
छिंदवाड्याचे खासदार कमलनाथ यांच्या मते, ते जेव्हा एखादी समस्या घेऊन
सोनिया गांधी यांच्याकडे जातात तेव्हा त्या आपल्याला राहुल गांधींकडे
पाठवितात आणि राहुल यांच्याकडे जावे तर ते म्हणतात, कॉँग्रेस अध्यक्षच या
समस्येची उकल करतील. त्या पक्षात असा एकूणच गोंधळ असताना, पक्षाचे एक
ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि त्यांच्यासारखेच इतरही काही राहुल गांधींना
पक्षाध्यक्ष बनवावे, अशी मागणी धरून बसले आहेत. पण त्यावर पक्षाध्यक्ष
मात्र म्हणतात, जेव्हा निर्णय होईल तेव्हा साऱ्यांना तो कळेलच.
पक्षाचे आणखी एक नेते जयराम रमेश यांनी तर हैदराबादेत पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना, राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेविषयीच शंका उपस्थित केली होती. त्यावर या कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या जागी, त्यांच्या भगिनी प्रियंका वढेरा यांना आणावे, अशी मागणी केली. या मागणीला आता अन्यत्रही समर्थन मिळू लागले आहे.
सध्या तरी राहुल गांधी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष आणि वारसदार आहेत. त्यांच्या अचानक रजेवर जाण्याने नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली आहे, त्यामागे आई आणि मुलामधील एकतर मतभेद असू शकतात वा लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षात निर्माण झालेला निष्ठेचा अभाव हे कारण असू शकते. प्रसारमाध्यमे जर याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत असतील तर त्यात आश्चर्य नाही. तथापि, राहुल गांधी यांना काँग्रेसने आपला वारसदार निश्चित केला असेल तर भलत्या वेळी ते सुटीवर का गेले, हे जाणून घेण्याचा अधिकार कॉँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि जनता यांना नक्कीच आहे. पक्षाचे एक प्रवक्ते राजीव गौडा यांच्या मते मात्र संपूर्ण पक्षयंत्रणा उभय नेत्यांच्या नेतृत्वावर प्रचंड खूश आहे !
खासदार कमलनाथ मात्र गौडा यांच्याशी सहमत नाहीत. याचा अर्थ पक्षात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे व हा गोंधळ पक्षाला दुर्बल करतानाच जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण करीत आहे. कॉँग्रेस स्वत:च या गोंधळास जबाबदार आहे. संपुआ सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योगमंत्री राहिलेले कमलनाथ यांनीच सर्वप्रथम या गोंधळास वाचा फोडली आहे. १९७७च्या जनता लाटेत मे २०१४च्या मोदी त्सुनामीतही कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील आपली छिंदवाड्याची जागा कायम राखली आहे. यावेळी मध्य प्रदेशातून जे केवळ तीन काँग्रेस उमेदवार विजयी झाले, त्यांच्यातील एक म्हणजे कमलनाथ. परिणामी तब्बल १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाचा हा प्रारंभ तर नव्हे ना, असे आता जनतेला वाटू लागले आहे.
भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस हा खरे तर स्वातंत्र्यानंतरचा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस अस्तित्वात आली. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती विसर्जित करून टाकावी, असा गांधीजींचा सल्ला होता. पण हा सल्ला टाळला गेला आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या अभिलाषेने तिचे राजकीय पक्षात रूपांतर करण्यात आले. राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांना एका समूहात आणण्याचा मध्यममार्ग म्हणून तसे केले गेले. तरीही जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, राजाजी आणि अन्य काही नेत्यांमध्ये प्रबळ असे धोरणात्मक मतभेद होतेच. पक्षात नेहरुंचा प्रभाव वाढताच सामूहिक नेतृत्वाचा ऱ्हास होत गेला. नेहरूंच्या लोकप्रियतेची बरोबरी इतर कुणालाही करता आली नाही, हेही तितकेच खरे. लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर राष्ट्रीय नेते घडवण्याची शेवटची संधी कॉँग्रेसने गमावली. इंदिरा गांधींनी पक्षांतर्गत सामूहिक नेतृत्वाच्या विरोधात लढाई जिंकताच पक्षातील बहुनेतृत्वाची आणि राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व उभारले जाण्याची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली.
१९७० पासून कॉँग्रेसने एकाच परिवाराला आपल्या भवितव्याचा आधार बनवून टाकले. आसामातील एक काँग्रेस नेते आणि पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी म्हटल्याप्रमाणे १९७१ पासून पक्षाची अवस्था, इंदिरा म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे इंदिरा अशी होती. पक्षासाठी नेहरू-गांधी परिवार हा एकमात्र टेकू होता व चालकही तोच होता. पण मे २०१४ च्या निवडणुकीने सारे काही बदलून टाकले आहे.
देशातील आजच्या एकूण परिस्थितीचा अंदाज घेता, काश्मिरात शेख अब्दुल्लांच्या तिसऱ्या पिढीची सत्ता संपुष्टात आली आहे. उत्तर प्रदेशातील सध्याची समाजवादी पार्टीची राजवट राज्याला आर्थिक संकटाकडे घेऊन चालली आहे. तामिळनाडूत डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या दोन पुत्रांमध्ये विद्रोह निर्र्माण झाला आहे. अशा वेळी देशातल्या या स्थितीचा लाभ उठवून काँग्रेस पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न का करीत नाही? याचे एकमात्र उत्तर म्हणजे पक्ष एका परिवाराभोवती फिरतो आहे, कोणत्याही विचारसरणीच्या भोवती नव्हे.
राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्न उभे राहत असताना आणि ते स्वत: गूढपणे विजनवासात गेले असताना कॉँग्रेस कार्यकर्ते पुन्हा नेतृत्वासाठी त्याच परिवारातील दुसऱ्या व्यक्तीचे नाव पुढे करीत आहेत. याचा अर्थ नेतृत्वक्षमता धारण करणाऱ्या पक्षातील इतरांचे खच्चीकरण केले जात आहे. अशा स्थितीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाला आव्हान देण्यासाठी कॉँग्रेस सोडून कुणी तिसराच एखादा छोटा पक्ष उभा राहिलेला दिसेल, असे आता वाटू लागले आहे.
बलबीर पुंज
(संसद सदस्य, भाजपा)
0 comments