जीवनाशी संघर्ष करून इतरांना आधार

Tuesday, January 27, 2015

पुणे - ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तिला ‘एचआयव्ही’ असल्याचं कळालं अन्‌ ती हादरून गेली...पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्नही भंगले...त्यात सभोवतालच्या दुनियेचा त्रास...पण, ती डगमगली नाही...परिस्थितीशी, संघर्षाशी सकारात्मक लढा देत आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे...एक उत्कृष्ट शिक्षक आणि एक खेळाडू म्हणून तिने उंच भरारी घेतली आहे. सलमाची (नाव बदलेले आहे) कहाणी प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

‘ममता फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये तिच्यासारख्याच एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला-मुलींची ती आधार बनली आहे. योगासन-प्राणायाम, कराटे आणि खो-खो, क्रिकेट यांसारखे खेळ मुलांना शिकवून त्यांचे आयुष्य सुदृढ आणि निरोगी बनवण्याचा प्रयत्न ती करत आहे. ‘कराटे’त ब्लॅक बेल्ट प्राप्त केलेल्या आणि विविध खेळांमध्ये सलमा पारंगत आहे. आई-वडिलांचे छत्र नसूनही सलमाने आयुष्यात मिळविलेला हा स्वआधार तिच्या जगण्याला नवी उमेद देत आहे.

अलिबाग येथील संपर्क बालग्राममध्ये ती वाढली. तिथेच बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ऑक्‍टोबर २०१३ मध्ये बारामतीत तिने पोलिस खात्यात भरतीसाठी प्रयत्न केला. पण, यश मिळाले नाही. पण, याच दरम्यान तिला एचआयव्ही झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सलमाला धक्का बसला. अनाथ असल्यामुळे एचआयव्ही कोणाकडून? कसा? आणि कोणत्याप्रकारे? झाल्याचे तिला माहीत नव्हते. पण, जीवनाशी संघर्ष करून इतरांसाठी जगण्याचा ध्यास तिने घेतला. फाउंडेशचे अध्यक्ष अमर बुडुख यांच्या प्रयत्नातून तिला फाउंडेशमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. ती मुलांना सकाळी सात वाजता व्यायाम, योगासने आणि प्राणायाम शिकवते. तर सायंकाळी दोन तास त्यांना कराटे, खो-खो, क्रिकेट असे विविध खेळ शिकवते.

सलमा म्हणाली, ‘‘आपल्यासारख्याच इतर मुलांना शिकवताना त्यांनी स्वस्थ आणि सृदृढ जगावे ही भावना मनात असते. मी खेळाडू आहे. त्यामुळे शाळेत असल्यापासून मी आहार आणि व्यायामाकडे लक्ष देत होते. त्यामुळे मला एचआयव्ही होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु तरुणपणी एचआयव्ही झाल्याची जाणीवच माझ्यासाठी धक्कादायक होती. पण, मी या संघर्षाशी सामना करण्याचे ठरवले व मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे.’’

आज ती तिच्यासारख्या इतर मुलांना एक निरोगी आयुष्य जगण्यास प्रेरित करत असल्याचे समाधान वाटते. तिचे स्वप्न जरी अपुरे राहिले असले, तरी तिच्यासारख्याच इतर मुलांना जगण्याची नवी उमेद देत असल्याचा आनंद वाटतो. गेल्या सहा महिन्यांपासून ती संस्थेत काम करत असून, तिच्या मेहनतीचा व सकारात्मक विचारांचा आम्हाला आदर वाटतो.
- अमर बुडुख, अध्यक्ष, ममता फाउंडेशन

You Might Also Like

0 comments