पीके, हिंदुत्ववादी, धंदा व राजकारण...

Tuesday, January 27, 2015

"मिस्टर पर्फेक्‍शनिस्ट‘ असे म्हटले जाणाऱ्या अभिनेता आमीर खान याच्या "पीके‘ या चित्रपटाच्या कमाईने नुकताच 300 कोटी रुपयांच्या पलीकडचा पल्ला गाठून इतिहास घडविला आहे. आमीर याचा पीके हिंदुविरोधी असल्याचा आरोप करत देशातील विविध भागांमध्ये उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी यासंदर्भात जोरदार विरोध दर्शविला असून; काही ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराचाही प्रकार घडला. या पार्श्‍वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या एका करमणूक प्रधान चित्रपट उद्योगाची निर्मिती असलेला पीके व त्यावरुन होणारा गोंधळ समजावून घेणे आवश्‍यक आहे.

पीके हा बॉलिवूडमधील रेडी, वॉंटेड, धूम 3, रा वन वा तत्सम गल्लाभरु चित्रपटांप्रमाणेच अन्य एक धंदेवाईक चित्रपट असल्याची बाब त्याचे विश्‍लेषण करण्याआधी ध्यानात घेणे आवश्‍यक आहे. या दृष्टिकोनामधून पीकेसारख्या चित्रपटाचे विश्‍लेषण करण्याची खरं पाहता कोणतीही आवश्‍यकता नाही. मात्र समाजामध्ये प्रादुर्भाव झालेल्या सामान्य मूर्खपणाचा फायदा घेत फुटकळ वाद निर्माण करुन धंदा करण्याचे जुने कसब पीकेच्या माध्यमामधून उत्तमरित्या वठविण्यात आल्याने या चित्रपटाची दखल घेणे गरजेचे आहे. यामुळे पीके ही एक कलाकृती वगैरे असल्याचा वृथा भ्रम मनाशी जपण्यात काहीही अर्थ नाही. कारण कलाकृती ही प्रतिभेची निर्मिती असते व पीके हा देशातील समाजाच्या एकूण आवड-अभिरुचीचा "लसावि‘ काढून तयार करण्यात आलेला एक "जुगाड‘ आहे. यामुळे साहजिकच पीकेसंदर्भात बोलताना कलात्मक अभिव्यक्ती, वेगळा दृष्टिकोन, मतस्वातंत्र्य वा लोकशाहीचे सौंदर्य असल्या भूमिकेचा आश्रय घेण्याची गरज नाही. ही बाब पीकेचे समर्थन करणाऱ्यांनी, विशेषत: धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घेणे अत्यावश्‍यक आहे.

पीके काय आहे? एक परग्रहवासी (अर्थात, आमीर खान!) पृथ्वीवर (अर्थात, भारतामध्ये!) येतो. इथे आल्यावर त्याच्या गळ्यामधला ताईत हरवतो व पुन्हा आपल्या ग्रहाशी संपर्क साधण्याचे साधन तो गमावून बसतो आणि त्यानंतर या पृथ्वीच्या देवास शोधून त्याला आपला ताईत मागण्यासाठी त्याचा प्रवास सुरु होतो. या प्रवासामध्ये त्याला आलेले अनुभव व त्यातून त्याने काढलेला मार्ग हा पीके चित्रपटाचा गाभा... मुळात या कथेसाठी परग्रहवासी असण्याची काय गरज आहे? आपल्या आजुबाजुला असे लोक (खुद्द आपणही त्यामध्ये आलोच!) शेकड्याने आढळतील; जे स्वत:च्या गरजेपायी परमेश्‍वरास साकडे घालत असतात व त्यात यश न आल्याने त्याला दोषही देत असतात. मात्र पृथ्वीवरील व्यक्तिरेखा दाखविल्यास त्याला नाव द्यावे लागेल, त्याचा धर्म दर्शवावा लागेल.. म्हणून कथेमधील मुख्य पात्रच परग्रहवासी करण्यात आले आहे. तेव्हा या व्यक्तिरेखेच्या सुरुवातीपासूनच दिग्दर्शकाचा पळपुटेपणा सुरु होतो, असे म्हणण्यास कोणताही प्रत्यवाय नाही. चित्रपटामध्ये आमीर याच्या परग्रहावरील असण्याचा हा व इतकाच अर्थ आहे. यापरती त्या व्यतिरेखेस कोणतीही व्याप्ती नाही.

शिवाय, परग्रहवासी हा हुबेहुब मानवासारखा दर्शविल्यामुळे यासंदर्भात कोणताही अभ्यास करण्यात आला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. परग्रहवासी हा हुबेहुब मानवासारखा दर्शवून आपण प्रत्यक्ष निसर्गाचाच अपमान करत आहोत, ही बाब हिरानी, आमीर वा तत्सम छोट्या लोकांच्या ध्यानात येणे शक्‍य नाही. या व्यतिरेखेमुळे मानवाच्या बुद्धीमध्ये भिनलेला स्वत:विषयीचा दुराग्रह अस्पष्टरित्या व्यक्त होतो. मानव ही विश्‍वाच्या जगड्‌व्याळ पसाऱ्यामधील एक अत्यंत तात्पुरती व क्षुल्लक निर्मिती आहे. ही अशा प्रकारची निर्मिती निसर्गाकडून पुन्हा होणे शक्‍य नाही; व त्यामुळेच दुसऱ्या ग्रहावरील सजीवही मानवासारखेच असण्याची कल्पना जवळपास अशक्‍य आहे. या पार्श्‍वभूमीवर वर उल्लेखिल्या एका मुद्याकडे पुन्हा जाणे भाग आहे. चित्रपटातील या मुख्य व्यक्तिरेखेचे समर्थन कलाकाराचे स्वातंत्र्य/प्रतिभा या भूमिकेंतर्गत होऊ शकत नाही. या मूर्खपणास मूर्खपणा म्हणण्याचे धाडस कधीतरी भारतामधील चित्रपट परीक्षक व विशेषत: पत्रकारांना दाखवावे लागेल. याशिवाय गळ्यामधील ताईत, त्यामधून परग्रहाला संदेश हा प्रकार अगदीच बालिश आहे. शालेय निबंधांमधील "एलियन्स‘सुद्धा यापेक्षा अधिक बरे असतात. शिवाय जो जीव निव्वळ हात लावून एखाद्याची भाषा आत्मसात करु शकतो, वा दुसऱ्याच्या मनामधील भावना स्पर्शाने जाणू शकतो, त्याला देव ही संकल्पना समजून घेताना इतके सायास पडतात, ही बाब तर्कसुसंगत वाटत नाही. मात्र संबंध चित्रपटच अशा प्रकारच्या तकलादु बाबींवर आधारलेला असल्याने या मुद्याचा उहापोह आणखी पुढे करता येईल. अशा प्रकारच्या गलथान, भोंगळपणामुळेच मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपट हे जगभरातील चित्रपट अभ्यासकांच्या निखळ मनोरंजनाचे साधन आहे, ही बाब मांडणे अत्यावश्‍यक आहे.

पीके हिंदु धर्माला विशेषत्वाने लक्ष्य करतो, हा या चित्रपटासंदर्भातील मुख्य आक्षेप आहे. चित्रपटामधील प्रसंगांमधून नायक हा हिंदु देवतांच्या पूजनाच्या कर्मकांडामधील फोलपणा दाखवित असल्याचेही चित्रीकरण करण्यात आले आहे. अर्थात, नायक हा चित्रपटामध्ये हिंदु, इस्लाम व खिश्‍चन धर्मामधील विविध व्रते, पद्धती अंगीकारत देवाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु अर्थातच त्याला यश येत नाही व आपले सर्व प्रयत्न देवाऐवजी दुसऱ्याच कोणा भोंदुसाठी केले जात असल्याची जाणीव त्याला अंतिमत: होते. या एकंदर प्रकारामधील भोंदुपणा दर्शविण्यासाठी हिंदु धर्मामधील एका बाबाचे पात्र चित्रपटामध्ये तयार करण्यात आल्याने गहजब उडाला. तेव्हा पीकेमधील चित्रण व प्रत्यक्षामधील परिस्थितीचा परस्पर संबंध काळजीपूर्वक ताडून पहावयास हवा. इस्लाम वा अन्य इतर कोणत्याही धर्मामधील अशा स्वरुपाचे भोंदु चित्रीकरण कोणत्याही चित्रपटामध्ये दाखविण्यात येत नाही; मग हिंदु धर्मासच विशेषत्वाने लक्ष्य का करण्यात येते, असा प्रश्‍न विचारत काही हिंदुत्ववादी संघटनांनी यावर हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केली. या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होतात व त्यांवरुन अशा विशिष्ट परिस्थितीमधील भूमिका ठरविणे भाग आहे. सर्वांत महत्त्वाची बाब - धार्मिक अपप्रकार, चुकीच्या चालिरीती व परंपरा, ढोंग व भोंदुपणा ही जगातील सर्व धर्मांमधील कीड आहे. यासंदर्भात एका विशिष्ट धर्मासच लक्ष्य का केले जाते, हा आक्षेप जरुर असू शकतो; मात्र त्यावरुन हिंसाचार करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये कोणासही असू शकत नाही. तेव्हा हिंदुत्ववादी संघटनांच्या भूमिकेबद्दल मतमतांतर असू शकेल; परंतु त्यांचा पवित्रा सर्वथा चुकीचा व त्याज्य आहे.

हिंदु धर्मामधील चुकीच्या प्रथांवर वा रुढींवर गेल्या अनेक शतकांपासून भारतीय व भारताबाहेरच्या अनेक अभ्यासकांनी कोरडे ओढले आहेत. यांमध्ये काही सत्शील विद्वान होते, तर काही विशिष्ट विचासरणीचे, वंशवर्चस्ववादी विकृत मानसिकतेचे लेखकही होते. परंतु हिंदुंमधील न्यून, गैरसमज, अपप्रकार दाखविण्याच्या या शतकानुशतके चाललेल्या प्रक्रियेमुळे हिंदु धर्मास प्रचंड फायदा झाला आहे. अगणित नव्या बदलांनी हिंदु धर्माच्या प्रगतीस हातभार लावला आहे. इतर धर्मांच्या तुलनेत हिंदु समुदायामध्ये असलेल्या निष्क्रिय सहिष्णुतेमुळे ही बाब शक्‍य झाली आहे. परंतु हिंदु धर्मामधील चुकीच्या बाबी दाखविणे, हाच काही सर्वांचा उद्देश नव्हता. हिंदु धर्मास यशाशक्ती बदनाम करण्याचाही पुरेपुर प्रयत्न आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर केला गेला. तेव्हा हिंदु धर्मावरील प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष टीकेस प्रतिसाद हा यासंदर्भातील विशिष्ट प्रकरणाच्या अभ्यासानंतरच ठरवावयास हवा. हिंदु धर्मावर आत्तापर्यंत झालेल्या टीकेच्या, अभ्यासाच्या तुलनेत पीके हा चित्रपट अगदीच क्षुल्लक व दर्जाहीन आहे. शिवाय, एका गल्लाभरु चित्रपटामधील काही प्रसंगांनी भावना दुखाविल्या जाणे, हे अज्ञान व असमंजसपणाचे लक्षण आहे. किंबहुना असा काही वाद उत्पन्न होऊन त्याचा चित्रपटास फायदा होऊ शकेल, हेच खरे व्यावसायिक गृहितक असण्याची शक्‍यता जास्त आहे. तेव्हा कोणत्याही प्रसंगी अस्तन्या सरसावून हिंसाचारास उद्युक्त होण्याचा हा प्रकार देशातील तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी टाळावयास हवा. साधारणत: अशाच स्वरूपाची पटकथा असलेला ओ माय गॉड हा चित्रपटही नुकताच येउन गेला. त्या चित्रपटामध्ये निव्वळ हिंदु धर्मामधील कर्मकांडास लक्ष्य करण्यात आल्यानंतरही त्यावर हिंदुविरोधाचा आरोप झाला नाही. तेव्हा चांगली पटकथा व शिताफीने आपला विचार घुसविण्याचा धंदेवाईकपणा यामधील सीमारेषा सामान्य प्रेक्षकांना कळत नाही, असा समज करून घेण्यात अर्थ नाही.         

भारताच्या स्वातंत्र्यानंतर येथील हिंदुत्ववादी पक्षास जवळजवळ राजकीयदृष्टया अस्पृश्‍य मानण्यात आले. आज काळ बदलल्यानंतर हिंदुत्ववाद्यांची सत्ता आली आहे; मात्र अजूनही एखादा चित्रपट, नाटक, पुस्तक वा इतर कथित वादग्रस्त गोष्टींसंदर्भातील हिंदु संघटनांचा प्रतिसाद हा समंजसपणाचा आढळत नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेमधील तथ्यांशही आपसूकच दुर्लक्षिला जातो. उदाहरणार्थ, या पीके चित्रपटाचे स्वागत करुन देशातील धर्मनिरपेक्षता व लोकशाही स्वातंत्र्याचा गौरव करत "इनोसन्स ऑफ मुस्लिम्स‘, "एंजल्स अँड डेमॉन्स‘ वा "मी नथुराम गोडसे बोलतोय,‘ या "कलात्मक अभिव्यक्ती‘च्या चित्रपटांच्या प्रदर्शनास "धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या शिलेदारांना‘ बोलाविण्यास काय हरकत आहे? वेंडी डोनिंजर यांच्या "द हिंदुज: ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी‘ या पुस्तकाबरोबरच सलमान रश्‍दी यांच्या "द सटॅनिक व्हर्सेस‘ वा तस्लिमा नसरीन यांच्या "लज्जा‘ या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार असलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनादर्शनाचाही आग्रह, जावेद अख्तर यांच्यासारख्या अनेक निखळ धर्मनिरपेक्षतावाद्याकडून प्रेमाने वदवून घेण्यास कोणती आडकाठी आहे? "व्हॅलेंटाईन डे‘ दिवशी हिंदु जहालवाद्यांकडून करण्यात येणारा तमाशा टाळून देशात शतकानुशतकांची मोठी परंपरा असलेल्या "वसंत पंचमी‘च्या सणाचा प्रसार आधुनिक पद्धतीने करता येणार नाही काय? तेव्हा अशा प्रकरणांमध्ये आक्रस्ताळेपणा टाळून लोकमान्य मार्गांचा आधार घेतल्यास हिंदुत्ववादी असणे लोकांना विचित्र वाटणार नाही; व कथित ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचे पितळही उघड पाडता येईल. या देशामध्ये खरी धर्मनिरपेक्षता नाही, हे तर सत्यच आहे. मात्र यामागे राजकीय कारस्थानाप्रमाणेच हिंदुत्ववाद्यांच्या धोरणातील आधुनिकता व कालसुसंगतेचा अभाव हेदेखील मोठे कारण आहे. पुस्तकाचे उत्तर पुस्तकाने व चित्रपटाचे चित्रपटानेच द्यावे लागेल; व तेच लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. तेव्हा या अतिमहत्त्वपूर्ण विषयाच्या व्याप्तीच्या क्षितिजावर पीकेसारख्या हीन अभिरुचीच्या चित्रपटाची दखल घेणे अनावश्‍यक व कालापव्यय करणारे आहे; परंतु ही बाब ध्यानात घेतली, तर त्या हिंदुत्ववादी संघटना कसल्या?!

हिंदुधर्मावरील टीकेशिवाय दुसरा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय पीकेमध्ये आहे. एका पाकिस्तानी मुस्लिम तरुणाचे भारतीय हिंदु मुलीवरील प्रेम.. "लव्ह जिहाद‘ हा देशामधील एक संवेदनशील विषय आहे. तेव्हा या विषयाशी संबंधित काहीतरी दाखविल्यास चर्चा होऊन व्यवसाय वाढेल; शिवाय भारताबाहेरील हिंदी जाणणाऱ्या मुस्लिम देशांमध्येही चित्रपट उत्तम चालेल, हे साधे व्यावसायिक गणित. देशामध्ये या प्रकरणामुळे सुरक्षा संस्था, न्यायालय व चक्क राजकीय नेत्यांनीही चिंता व्यक्त केली असताना या प्रकरणाचा अभ्यास करुन त्यावर नेटकी भूमिका घेण्यासाठी धाडस हवे. उदहरणार्थ, भारतातीय क्रिकेटचे गौरवस्थान असलेले "टायगर‘ मन्सूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा असलेला अभिनेता सैफ अली खान याने एका वृत्तपत्रामध्ये लव्ह जिहादचे खंडन करण्यासंदर्भातील लिहिलेला लेख असो; वा अन्य अशा स्वरुपाची भूमिका असो. लोकशाहीमध्ये एखादी बाब चूक वा बरोबर असू शकत नाही; परंतु आपल्या भूमिकेचे नैतिक समर्थन देता येणे, हे समंजसपणाचे लक्षण आहे. मात्र पीकेसारख्या चित्रपटांकडून अशा वैचारिक मांडणीची अपेक्षा करणेच मुळात अत्यंत गैरलागू व मूर्खपणाचे आहे. शिवाय, धंद्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करुन घेणे त्याज्य नाही. तेव्हा लव्ह जिहाद असो वा हिंदुधर्मावरील टीका असो, पीकेमधून दिग्दर्शकाला जबाबदारीने कोणतेही विधान करावयाचे नाही; तर देशात सध्या चलती असलेल्या या विषयांच्या चित्रपटातील अंत:र्भावाने धंदा करायचा आहे, ही बाब लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

पीकेच्या आर्थिक पतपुरवठ्यासंदर्भात (फंडिंग) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला आरोप हा या सर्व वादापेक्षा अधिक महत्त्वाचा व संवेदनशील आहे. पीकेला आयएसआय व दुबईमध्ये बस्तान बसविलेल्या अंडरवर्ल्डचा आर्थिक पाठिंबा मिळाल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. "शिकलेले हिंदुत्ववादी‘ असा शिक्का मारुन स्वामी यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करणे वाजवी ठरणार नाही. कारण देशामधील काही प्रमुख अतिभ्रष्ट प्रकरणांमधील एक असलेल्या टू जी स्पेक्‍ट्रम व अन्या अशा स्वरुपाची अनेक प्रकरणे उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. वस्तुत: बॉलिवूडमधील चित्रपटाचे फंडिंग व त्यामागील गुन्हेगारी विश्‍व हा फारच संवेदनशील विषय आहे. चित्रपटांचे फंडिंग व इतर अशा स्वरुपाच्या अनेक अनियमित प्रकारांबद्दल आमीर खान, हिरानी यांना वाटेल तितके चित्रपट काढता येतील. परंतु तसे केल्यास त्यांच्यावर प्रामाणिकपणाचा, सचोटीचा आळ घेतला जाईल. यापेक्षा आपलं "सत्यमेव जयते‘ बरं, असा कदाचित त्यांचा विचार दिसतो. शिवाय, चित्रपटांच्या फंडिंगचा विचार केल्यास बॉलिवूडमधील निम्म्या दिग्दर्शक, निर्मात्यांना तुरुंगात टाकावे लागेल. तेव्हा या मुद्यावरुन निव्वळ पीकेस लक्ष्य करणे उचित होणार नाही. हा वेगळा, स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल.

पीके वा अन्य अशा स्वरुपाच्या चित्रपटांमुळे खरे नुकसान हे चित्रपट क्षेत्रामधील कलात्मकतेचे होत असते. याचे कारण म्हणजे असे अभिरुचीहीन चित्रपट व त्यावरुन चिडणाऱ्या; वा त्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमुळे या क्षेत्रामधील सर्जनशीलतेची खऱ्या अर्थी गळचेपी होते आहे. चित्रपट हे अखेर जनभावना प्रतिबिंबित करणारे माध्यम आहे. त्यामुळे पीकेसारखे चित्रपट वारंवार तयार होत असतील, तर या घसरलेल्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करावयास हवे. जागतिक चित्रपटांच्या क्षितिजावर भारतामधील हिंदी चित्रपटसृष्टीचे स्थान केवळ मनोरंजनापर्यंतच मर्यादित आहे; कारण त्यापलीकडे पाहण्याची ना प्रेक्षकांची इच्छा आहे; ना बहुतांश दिग्दर्शकांना त्याची गरज वाटते आहे. तेव्हा मुद्दा केवळ पीके वा अन्य अशा स्वरुपाचा चित्रपट नाही. मुख्य प्रवाहामधील माध्यमांमध्ये या चित्रपटांच्या व्यावसायिक परीक्षणाचा अभाव व कोणत्याही घटनेवरुन करण्यात येणारे राजकारण यांच्या आवर्तात सच्च्या, अस्सल निर्मितीची वाढ खुंटते आहे, हाच धडा पीकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दुर्दैव हे, की असल्या माणसांना आपल्याला "मिस्टर पर्फेक्‍शनिस्ट‘ म्हणावे लागते..

You Might Also Like

0 comments