निवृत्त पोलिस बनला लोणीत 'स्वच्छता दूत'

Tuesday, January 27, 2015

पारगाव : लोणी (ता. आंबेगाव) येथील सेवानिवृत्त पोलिस हवालदार वसंत धर्माजी पंचरास हे गेल्या तीन महिन्यांपासून दररोज सकाळी वस्तीतील मंदिर, रस्ता व सार्वजनिक विहिरीच्या परिसराची साफसफाई करीत आहेत. पंचरास हे स्वच्छता दूत बनून परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत.

मुंबई रेल्वे पोलिस दलात हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मे 2014 मध्ये पंचरास कुटुंबासह लोणी येथे गावी राहण्यासाठी आले. ते राहत असलेल्या पंचरास वस्तीमधील सार्वजनिक विहीर, रस्ते व मंदिर परिसरात कचऱ्याचे प्रमाण जास्त होते. पंचरास यांनी वस्तीवरील नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन अनेकदा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केल्यानंतर पंचरास यांनी 2 आक्‍टोबर 2014 रोजी गांधी जयंतीला हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत सलग तीन महिने ते रोज पहाटे साडेपाच वाजता उठून वस्तीतील रस्ता, विहीर, गणेश मंदिर व समाजमंदिर परिसराची स्वच्छता करतात. या कामासाठी त्यांना एक तास लागतो.
स्वच्छतेचा हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प केला आहे. वस्तीमधील सिद्धिविनायक मंदिराची दुरुस्ती करून मंदिर परिसरात झाडे लावून मंदिराचे सुशोभीकरण केले आहे. वस्तीमधील सार्वजनिक ठिकाणी; तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन ते करणार आहेत. सरपंच सावळेराम नाईक, माजी सरपंच उद्धव लंके, सुशीला पंचरास, अर्जुन पंचरास, काशिनाथ पंचरास, कांताबाई पंचरास यांनी प्रोत्साहन देत त्यांच्या अनोख्या समाजसेवेचे कौतुक केले आहे.

You Might Also Like

0 comments