लवकरच सुधारित गुगल ग्लास
Monday, January 19, 2015नव्या युगातील कॉम्पॅक्ट टेक्नो उपकरण म्हणून, अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या 'गुगल ग्लास'ची विक्री सोमवारपासून थांबवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. सध्या बाजारात असलेल्या उपकरणामध्ये आणखी काही सुधारणा करून 'गुगल ग्लास'ची नवी आवृत्ती लवकरच बाजारात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
मे २०१४मध्ये ग्राहकांना उपलब्ध झालेल्या गुगल ग्लासच्या सार्वजनिक वापरावर ब्रिटनमध्ये बंदी घातली होती. या उपकरणामुळे अवैध चित्रिकरण होते आणि खासगीपणाचा भंग होतो, या आरोपांवरून ब्रिटनमधील रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि चित्रपटगृहांमध्ये गुगल ग्लास वापरण्यावर बंदी होती. गुगल ग्लासची उपकरणे बाजारात राहणार नसली तरी त्याचे उत्पादन बंद होणार नाही. गुगल ग्लासच्या ठोक विक्रीबाबत ज्या कंपन्यांशी करार झालेले आहेत, त्यांनाही ते पोहोचविण्यात येणार आहेत.
गुगल ग्लासच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली होती. गुगल ग्लासमध्ये हॅकिंग रोखण्याची किंवा त्यातील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीची विशेष सोय नव्हती. त्यामुळे काही हॅकर्सनी गुगल ग्लास हॅक करण्याचा कोड जाहीरही केला होता. 'या उपकरणाच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच गुगलने ते बाजारात आणले होते. त्यामुळे त्यात अनेक दोष राहिले.
गुगल ग्लासशी सुसंगत अशी अॅप्स गुगलला देता आली नाही.त्यामुळे, भरपूर पैसे खर्च करून गुगल ग्लास घेणाऱ्यांच्या हाती निराशाच आली. यामुळे ही बाजारात गुगल ग्लासबद्दल फारशा चांगल्या प्रतिक्रिया आल्या नाहीत. या उपकरणाच्या पूर्ण चाचण्या घेतल्यानंतरच ते बाजारात आणायला हवे होते,' असे निरीक्षण एका आयटी तज्ज्ञाने नोंदविले.
0 comments