सैन्यदलातील अधिकारीपदाचा राजमार्ग

Monday, January 19, 2015


military 
भूदल, नौदल आणि हवाईदल अशा तिन्ही दलात अधिकारपद भूषविण्याची संधी एनडीए व एनए (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी अॅण्ड नेव्हल अॅकेडमी) परीक्षेद्वारे प्राप्त होते. तीनही सैन्यदलांच्या विद्यमान सर्वोच्च अधिका-यांनी एनडीए, एनएच्या माध्यमातूनच सैन्यदलात प्रवेश केला आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी)

भारतीय सशस्त्र दलांमध्ये 'परमनंट कमिशन'मध्ये अधिकारी म्हणून जाण्याचा एक मार्ग 'नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी' या संस्थेत प्रवेश मिळविणे. इथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोनदा परीक्षा घेण्यात येते.

पात्रता : १६ वर्षे ते १९ वर्षे अशी वयोमर्यादा आहे. एनडीएच्या भूदल शाखेसाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतात, तर नौदल व हवाई दलासाठी मात्र बारावीला भौतिकशास्त्र व गणित हे विषय असणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी अविवाहित पुरुष पात्र असतात.

लेखी परीक्षा :

लेखी परीक्षेसाठी एकूण दोन प्रश्नपत्रिका असतात.

प्रश्नपत्रिका-१ ही गणित विषयाची असून यासाठी ३०० गुण असतात, तर प्रश्नपत्रिका-२ ही सामान्य क्षमता चाचणीची असते. यात इंग्रजी, इतिहास, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, भूगोल, चालू घडामोडी, सामान्यज्ञान व विज्ञानावर आधारित प्रश्न असतात. यासाठी ६०० गुण असतात. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येकी अडीच तासांचा वेळ असतो. प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ असते.

मुलाखत : लेखी परीक्षेचा टप्पा पार केलेल्यांना मुलाखत तसेच बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्त्व चाचणी यासाठी बोलावणे जाते.

प्रशिक्षण : भूदल, नौदल, हवाई दलासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे तीन वर्षांपैकी पहिल्या अडीच वर्षांचे प्रशिक्षण सर्वाना समान असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/ बी.ए.ची पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीद्वारे दिली जाते. यानंतर भूदलातील उमेदवारांचे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून, नौदलाचे प्रशिक्षण इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, इझिमाला व हवाई दलाचे प्रशिक्षण इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद येथे पार पडते.नेव्हल अ‍ॅकॅडमीसाठी निवड झालेल्या उमेदवाराचे चारही वर्षांचे प्रशिक्षण इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, इझिमाला येथे होते व प्रशिक्षणार्थीना बी.टेक्. पदवी मिळते.

प्रवेश अर्ज - या परीक्षेचे प्रवेश अर्ज www.upsconline.nic.in या वेबसाईटवरुन भरायचे आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०१५ आहे.

लेखी परीक्षा - १९ एप्रिल २०१५ रोजी घेण्यात येणार आहे.

परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती www.upsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

You Might Also Like

0 comments