धार्मिक भेदभाव भारताला धोकादायक - ओबामा

Tuesday, January 27, 2015

‘भारतीय राज्यघटनेने नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या धर्मपालनाचे स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि जोपर्यंत धार्मिक आधारावर विखुरलेपणा येणार नाही, तोपर्यंत भारताची यशस्वी वाटचाल चालू राहील,‘ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीची सांगता त्यांनी या जाहीर भाषणाने केली. गेल्या काही दिवसांत देशात कट्टरपंथी धार्मिक शक्तींनी डोके वर काढण्याच्या पार्श्‍वभूमीवर व विशेषतः केंद्रात सत्तारूढ राजकीय पक्षाशी निगडित या संघटनांच्या कृतींच्या पार्श्‍वभूमीवर ओबामांचे निरोपाचे वक्तव्य एकप्रकारे भाजप व संघपरिवारासाठी कानपिचक्‍याच ठरले.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 25चा दाखला देऊन ओबामा म्हणाले, ""कोणतेही भय किंवा भेदभावाशिवाय धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे आणि जोपर्यंत भारतात धार्मिक आधारावर भेदभाव होणार नाहीत, तोपर्यंत भारताची यशस्वी वाटचाल चालू राहील. अमेरिकेप्रमाणेच भारतातही कोणीही नागरिक त्याच्या पसंतीनुसार धर्माचे पालन करू शकतो आणि त्याचा प्रचार व प्रसार करू शकतो. ज्याप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे, तशीच ती संबंधित सरकारवरही आहे हे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. भारत व भारतीय समाज एकजूट राहिला तरच तो प्रगतिपथावर राहील.‘‘
अमेरिकन वकिलात आणि काही खासगी संस्थांच्या सहभागातून ओबामा यांनी येथील सिरी फोर्ट प्रेक्षागृहात निरोपाचे हे जाहीर भाषण केले. या भाषणाच्या वेळी प्रामुख्याने युवक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती आणि त्यासाठी काही खासगी शिक्षणसंस्थांबरोबर सहकार्य करण्यात आले होते. या युवकांसमोर बोलताना ओबामा यांनी प्रामुख्याने लोकशाही, लोकशाही मूल्ये व त्यात अंतर्भूत असलेली स्वातंत्र्य, सामंजस्य, सहिष्णुता व शांततामय सहजीवनाची मूल्ये यावर भर दिला. या भाषणात त्यांनी भारत व अमेरिकेच्या समान लोकशाही संस्कृतीचा दाखला दिला आणि दोन्ही देश "नैसर्गिक भागीदार‘ असले तरी, भावी काळात दोन्ही देश "सर्वोत्कृष्ट भागीदार देश‘ म्हणून ओळखले जावेत, अशी आपली मनापासून इच्छा असल्याचे सांगितले.
सहिष्णुतेवर भर देताना ओबामा यांनी आपलाच धर्म आणि श्रद्धा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात तीच मंडळी असहिष्णुता, हिंसाचार आणि दहशतवादास कारणीभूत असल्याची उदाहरणे जगात दिसत असल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले आणि अशा फाटाफूट किंवा विभाजन करणाऱ्या शक्तींपासून आपण स्वतःचा बचाव करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. ओबामा यांनी महात्मा गांधींचेही यानिमित्ताने स्मरण केले. "सर्व धर्मांचे उगमस्थान हे ईश्‍वर असून तो एकच आहे,‘ या महात्मा गांधी यांच्या वचनाचा संदर्भ त्यांनी दिला.
भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना ओबामा यांनी उभय देश केवळ नैसर्गिक भागीदार नसून भविष्यात जगातले सर्वोत्कृष्ट भागीदार देश म्हणून ओळखले जावेत, अशी इच्छा व्यक्त केली. जागतिक पातळीवरील भूमिकेचा निर्णय भारत व भारतीयांनीच करावयाचा आहे; परंतु हे दोन लोकशाही देश एकत्र आल्यास जग अधिक सुरक्षित व न्याय्य आणि विषमतावरहित होण्यास मदत होईल. दोन्ही देशांतील लोकांना रोजगार आणि संधींची विपुल प्रमाणात उपलब्धता होईल आणि तो विश्‍वास बाळगूनच आपण भारत भेटीवर आलो, असे त्यांनी सांगताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आशिया खंडात चीनच्या वाढत्या प्रभावास आळा घालणे हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे एक प्रमुख सूत्र आहे. त्यासाठीचा एक प्रमुख आशियाई सहकारी देश म्हणून अमेरिकेतर्फे भारताकडे पाहिले जाते. त्या पार्श्‍वभूमीवरच ओबामा यांनी आशिया-प्रशांत विभागातील भारताच्या वाढत्या भूमिकेला पाठिंबा देऊन त्याचे समर्थन केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दर्शविला.

बराक ओबामा म्हणाले...
- धार्मिक आधारावर विखुरलेपणा येणार नाही, तोपर्यंत भारताची यशस्वी वाटचाल चालू राहील
- कोणतेही भय किंवा भेदभावाशिवाय धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला
- भारत व भारतीय समाज एकजूट राहिला तरच तो प्रगतिपथावर राहील
- जागतिक पातळीवरील भूमिकेचा निर्णय भारत व भारतीयांनीच करावयाचा आहे
- "युनो‘तील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला पाठिंबा

लोकशाहीमुळेच सर्वोच्च पदावर...
ओबामा यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात कुचराई दाखविली नाही. लोकशाही व्यवस्थेची प्रशंसा करताना त्यांनी त्यांचे आजोबा स्वयंपाकी असल्याचे सांगितले आणि मोदी हेही साधे चहाविक्रेते असल्याचा उल्लेख केला आणि केवळ लोकशाहीमुळेच अशा सामान्य लोकांनाही उच्च किंवा सर्वोच्च पदावर स्थानापन्न होण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

भारतातील आर्थिक सुधारणांची गती गेल्या काही वर्षांत मंदावली आणि त्यामुळेच आर्थिक संबंधांत तणाव व नैराश्‍य आले होते; परंतु मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेत नवा जोम व जोष निर्माण केल्याचे ओबामांनी नमूद केले. भारताच्या विकासाच्या पुढच्या लाटेत अमेरिकेला भागीदार व्हावयाचे आहे. आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा करणाऱ्या भारताबरोबर व्यापार व गुंतवणूक यांच्या विस्तारित संधी आपण पाहात आहोत, अशी आशाही ओबामा यांनी व्यक्त केली.

भारताच्या विविधतेचे आणि भारतातही कौशल्य व गुणवत्तेची कमी नसल्याचा मुद्दा सांगताना ओबामा यांनी अभिनेता शाहरुख खान, मुष्टियोद्धा असलेली मेरी कोम, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा उल्लेख केला.

You Might Also Like

0 comments