भिवापुरी मिरची होणार जागतिक "ब्रॅण्ड'

Tuesday, January 27, 2015

नागपूर - झणझणीत चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी मिरचीच्या तिखटाचे नमुने जागतिक बॅंकेच्या चमूने ब्रॅण्डिंगसाठी मागविले आहेत. सर्वांच्या पसंतीस उतरल्यानंतर तिचे जगभर त्याचे मार्केटिंग केले जाणार असल्याने भिवापुरी मिरचीला लवकरच चांगले दिवस येणार आहे.

प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात पिकविल्या जाणाऱ्या भिवापुरी मिरचीची ख्याती सर्वत्र आहे. पण आजवर या मिरचीचे योग्य मार्केटिंग व ब्रॅण्डिंग झाले नाही. त्यामुळे काही कंपन्या आपल्या नावाने ब्रॅण्डिंग करून विक्री करीत होत्या. याचा मिरची उत्पादकांना कुठलाही लाभ मिळत नव्हता. यासाठी मागील वर्षीपासून कृषी विभागाचा आत्मा प्रकल्प आणि महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पांतर्गत उमरेड आणि कुही तालुक्‍यात शेतकऱ्यांचे चार गट तयार करून 230 एकरांवर भिवापुरी मिरचीची लागवड करण्यात आली. लागवडीपासून उत्पन्न हाती येईपर्यंत आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मिरचीवर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला. मिरचीपासून तिखट तयार करण्यासाठी त्यांना कांडप यंत्राचेही वाटप आत्मातर्फे करण्यात आले. शेतकरी गटांनी भिवापुरी मिरचीपासून तिखट तयार केले असून त्याचे "आत्मा नागपूर भिवापुरी मिरची‘ नावाचे ब्रॅण्ड तयार केले आहे. गेल्या वर्षीच भिवापुरी मिरचीची भौगोलिक सांकेतांकासाठी नोंदणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर या मिरचीची जागतिक बॅंकेने दखल घेतली आहे. बॅंकेची चमू 6 फेब्रुवारीला पुणे येथे येणार असून भिवापुरी मिरचीच्या तिखटाचे नमुने तपासणार आहे.

हे होणार फायदे
- जागतिक स्तरावर बाजारपेठ
- स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर
- स्थानिकांना रोजगाराच्या संधी
- मोफत ब्रॅण्डिंग

जागतिक बॅंकेने भिवापुरी मिरचीला पसंती दर्शवल्यास जागतिकस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबवून मिरचीची लागवड केल्यास मिरचीच्या मागणीत वाढ होईल.

You Might Also Like

0 comments