शिवरायांचे खरे गुरू राजमाता जिजाऊच!

Tuesday, January 27, 2015

चोपडा - आज ज्ञानाची लढाई यश मिळविण्यासाठी केली पाहिजे. शिवाजी महाराजांचे खरे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ आणि विद्यापीठ अर्थात गुरू कोण होते तर राजमाता जिजाऊच होते. त्यांनीच शिवरायांना वाढविले व हिंमतही दिली. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले.

येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानातून "शिवचरित्रातून काय शिकाल‘ या विषयावर ते बोलत होते.
श्री. कोकाटे म्हणाले, की आई जिजाऊसारखी पाठीशी असल्याशिवाय मुले कर्तृत्ववान बनणार नाहीत. प्रत्येक घरात शिवबा जन्माला येईल. पण त्यासाठी घाटा-घाटांत जिजाऊ निर्माण होण्याची गरज आहे.

जिजाऊ एक कर्तृत्ववान, बुद्धीवान, प्रयत्नवादी होत्या. आतापर्यंत कथेतून, चित्रपटातून, कादंबरी, नाटक, पाठ्यपुस्तक यातून शिवाजी महाराजांचे खरे गुरू रामदास, दादोजी कोंडदेव हे सांगितले गेले. परंतु ते कधीही गुरू नव्हते. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, की 33 कोटी देवाना विसरले तरी चालेल; पण शिवरायांना विसरू नका. रयतेचे राज्य निर्माण करणारा एकमेव नेता महात्मा फुलेंनी 904 ओळींचा राजांच्या जीवनावर पोवाडा तयार करून पहिली शिवजयंती 1869 मध्ये सुरू केली. असा राजा जगाच्या इतिहासात सापडणार नाही. रशियाचे पंतप्रधान मार्शल मुलगामी म्हणतात, की साम्राज्यशाहीविरुद्ध बंड करून गरिबांचे राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे शिवाजी, लंडनच्या इतिहासकाराने 12 व्या खंडात इतिहास लिहिला आहे. ते म्हणतात, की असा राजा आमच्या देशात जर जन्माला आला असता तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अक्षय ठेवा डोक्‍यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो. अठरापगड व बाराबलुतेदारांनी एकत्र नांदून गावविकास करावा.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवराय व तुळजाभवानीच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, उमेश मराठे, मनोज पाटील यांनी व्याख्यानासह सोबत विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

You Might Also Like

0 comments